आयसीटी, जीएमआर दत्तक घेणार चार मिनार व गोवळकोंडा


राजधानी दिल्लीतील मुघलांचा लाल किल्ला डालमिया समुहाला दत्तक दिल्यानंतर सरकारने निजाम व कुतुबशहा यांची स्मारके दत्तक देण्याची तयारी केली आहे. हैद्राबादमधील चार मिनार व गोवळकोंडा किल्ला दत्तक घेण्यासाठी सरकारकडे रुची प्रस्ताव (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) दाखल झाले आहेत. यातील चार मिनार दत्तक घेण्यासाठी आयसीटी या कंपनीचा एकमेव प्रस्ताव मिळाला आहे. त्यामुळे व्हिजन कमिटीने आयसीटीच्या नावाला मंजुरी दिली आहे.

दुसरीकडे जीएमआर स्पोर्ट्स या कंपनीने हैद्राबादमधील गोवळकोंडा किल्ल्यासाठी रस दाखवला आहे. या प्रस्तावांवर सरकार विचार करत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

हे दोन्ही प्रस्ताव ऍडॉप्ट हेरिटेज या योजनेअंतर्गत दाखल करण्यात आले आहेत. देशातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी ही योजना केंद्र सरकारने सप्टेंबर 2017 मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सुमारे 100 ऐतिहासिक स्मारकांचा समावेश आहे. यात ताजमहाल, लाल किल्ला, सूर्य मंदिर, गोवळकोंडा किल्ला आणि चार मिनार अशा मार्गांचा समावेश आहे.

या योजनेअंतर्गत तब्बल 25 कोटींमध्ये डालमिया ग्रुपनं युनेस्को जागतिक वारसा असलेला लाल किल्ला संवर्धनासाठी दत्तक घेतला आहे. डालमिया ग्रुप या 23 मे पासून किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामाला सुरुवात करणार आहे.

Leave a Comment