हेअर डाय आपल्या त्वचेवरून अश्या प्रकारे हटवा


आजकाल केस पांढरे झाले असता, किंवा केवळ फॅशन स्टेटमेंट म्हणून हेअर कलर किंवा डाय लावण्याची पद्धत लोकप्रिय होते आहे. आजकाल अगदी विशीतील तरुण मंडळी देखील आपले केस आकर्षक दिसावेत म्हणून हेअर कलरचा आवर्जून वापर करताना दिसतात. पण दरवेळी केसांना कलर करण्यासाठी पार्लरमध्ये जाणे वेळेअभावी शक्य होत नाही. अश्या वेळी घरीच हेअर कलर करण्यास लोक प्राधान्य देतात. अनेकदा केस कलर करीत असताना हा कलर कपाळावर, कानांवर, मानेवर ओघळतो, किंवा हातांच्या बोटांवर, नखांवर लागून राहतो. हा त्वचेवर लागून राहिलेला हेअर कलर सहजी निघत नाही. त्यामुळे केसांना कलर करताना जर तो कलर त्वचेवरही लागून राहिला तर तो हटविण्यासाठी काही उपाय करता येतील.

केसांना कलर करण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर, विशेषतः कपाळ, कान, मान आणि हातांवर व्हॅसलीन लावा. व्हॅसलीन लावल्यानंतर जरी डाय त्वचेवर ओघळला, तरी तो पाण्याने धुतल्यावर चटकन निघून जातो, तसेच व्हॅसलीनमुळे त्वचेला आर्द्रताही मिळते, आणि हेअर डायचा रंग त्वचा अवशोषित करून घेत नाही. जर हेअर डाय करण्यापूर्वी व्हॅसलीन लावण्याचा विसर पडला, तर कलर लाऊन झाल्यानंतर जिथे कलर त्वचेवर ओघळला आहे, तिथे व्हॅसलीन लाऊन सावकाश कलर निघून जाईपर्यंत चोळावे, आणि त्यानंतर चेहरा, किंवा मान, हात पाण्याने स्वछ धुवावेत. कलर हातांवर किंवा नखांवर लागून राहू नये या करिता हातमोज्यांचा वापर करावा.

त्वचेवरील लागून राहिलेला हेअर कलर हटविण्याकरिता एक कापसाचा बोळा व्हिनेगरमध्ये बुडवून त्याने त्वचेवरील रंग साफ करावा. मात्र व्हिनेगरचा वापर डोळ्यांच्या आसपासच्या नाजूक त्वचेवर करू नये. व्हिनेगरने रंग हटविल्यावर चेहरा पाण्याने धुवावा. एखादे सौम्य लिक्विड डीटर्जंट किंवा फेस वॉश सोबत थोडासा बेकिंग सोडा मिसळावा. दोन्हीचे प्रमाण एकसारखे असावे. हे मिश्रण हेअर कलर लागून राहिला असेल त्या भागावर चोळून लावावे. हे मिश्रण डोळ्यांच्या जवळ लावू नये. बेकिंग सोडा ह्यामध्ये असल्यामुळे हा त्वचेवर फार वेळ चोळू नये, अन्यथा त्वचेला नुकसान होऊ शकते. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवून टाकावा. जिथे कलर लागला आहे तो काढण्यासाठी तिथे टूथपेस्टचा वापर करावा. कलर लागलेल्या ठिकाणी किंचितशी टूथपेस्ट लाऊन हळुवार चोळावी. ह्यामुळे कलर निघून येण्यास मदत होईल.

Leave a Comment