नशेडी गाव बनले चेस व्हिलेज


केरळच्या त्रिसूर जिल्हातील मरोत्तीचल या गावाने देशतील अनेक खेड्यांना आदर्श घालून दिला आहे. १९७०-८० च्या दशकात नशेडी आणि जुगाऱ्यांचे गाव अशी ओळख असलेले हे गाव आता बुद्धिबळ गाव किंवा चेस व्हिलेज म्हणून नावारूपास आले आहे. सूर्य मावळताच दारुडे आणि जुगारी याच्या दहशतीमुळे गावात शुकशुकाट होत असे त्याचा गावात आता सायंकाळीही बुद्धिबळ खेळण्यासाठी गर्दी होते आणि यात पर्यटक आवर्जून सहभागी होतात.


अर्थात याचे सारे श्रेय जाते सी उन्नीकृष्णन यांच्याकडे. आजूबाजूला असलेल्या सुंदर डोंगररंगात वसलेले हे शांत गाव उन्नीकृष्णन लहान असताना पूर्ण नशेच्या अधीन झालेलेच पहिले होते. या गावात सर्व वयोगटातील जुगारी असायचे आणि त्यात अनेकांनी आयुष्य बरबाद करून घेतले होते. उन्नीकृष्णन याच्यावर शालेय वयात अमेरिकन बुद्धिबळपटू बॉबी फिशर याचा प्रभाव पडला आणि ते स्वतः बुद्धिबळ शिकले, गावातील लोकांना शिकवू लागले. हळू हळू संपूर्ण गावाला बुद्धिबळाचा नाद लागला आणि दारूची नशा उतरू लागली. आज हे सारे गाव बुद्धीला चालना देणारा हा खेळ खेळतात.


५९ वर्षाचे उन्नीकृष्णन चहाची टपरी चालवितात आणि येथेच बुद्धिबळाचे गेम रंगतात. त्यांनी ६०० हून अधिक जणांना या खेळाची दीक्षा दिली आहे आणि येथील खेळाडूंनी राज्यपातळीवर अनेक मेडल्स मिळविली आहेत. २०१६ मध्ये या गावाने एकावेळी १ हजार खेळाडूंनी खेळून आशियाई रेकॉर्ड केली आहे. येथे येणारे पर्यटक आवर्जून बुद्धिबळ खेळतात आणि गावात फिरून शांतता आणि सुंदर निसर्गाचा अनुभव घेतात.

Leave a Comment