अजब विवाहसोहोळे..कुठे वर गायब, तर कुठे वधूचा पोबारा !


भारतीय विवाहसोहोळे हे रीती-रिवाजांचे, परंपरेचे पालन करीत पार पाडले जाणारे सोहोळे आहेत. वर आणि वधू यांच्या आयुष्यातील हा सर्वात महत्वाचा दिवस. हा दिवस वर-वधुंच्या, आणि विवाहसोहोळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या दृष्टीने अविस्मरणीय व्हावा अशी सर्वांचीच इच्छा असते. त्यासाठी परिवारजन विवाह सोहोळ्याच्या कित्येक महिने आधीपासूनच तयारीला लागलेले असतात. विवाह सोहोळा दिमाखात पार पडावा, येणाऱ्या पाहुणे मंडळींच्या सरबराईमध्ये कसलीही उणीव राहू नये, आणि परतताना सर्वांनी आनंदाने आणि समाधानाने परतावे, असे वर-वधूच्या परिवारजनांना वाटत असते, आणि त्या दृष्टीने सर्व जण हर तऱ्हेने प्रयत्न करीत असतात.

अलीकडच्या काळामध्ये काही विवाहसोहोळे, त्यासाठी जमलेल्या पाहुण्यांच्या चांगलेच लक्षात राहिले, पण ते वेगळ्याच कारणांसाठी. एखाद्या विवाहसोहोळ्यातून वर गायब झाला, तर आणखी एखाद्या विवाह सोहोळ्यातून वधूने पोबारा केला. कुठे विवाह पार पडत असताना वधूच्या पूर्वप्रेमीने फिल्मी एन्ट्री करून धमाल उडवून दिली, तर कुठे वराचा चेहरा पाहून वधूची शुद्ध हरपली. ह्या घटनांमुळे वर-वधूंच्या परिवारजनांची अवस्था मोठी चमत्कारिक झाली असली, लग्नासाठी जमलेल्या पाहुणे मंडळींची मात्र चांगलीच करमणूक झाली आहे.

भोपालमध्ये आयोजित एका विवाहसोहोळ्यामध्ये वधूने वरासोबत चार फेरे पूर्ण केले, आणि अचानक मांडवातून पोबारा केला. वॉशरूममधून जाऊन येते असे सांगून चौथ्या फेऱ्यानंतर मांडवातून उठून गेलेली वधू मांडवामध्ये परतलीच नाही. ती गायब झाल्याच्या पुष्कळ वेळानंतर खरा प्रकार इतरांच्या लक्षात आला. ही घटना अगदी फिल्मी म्हणायला हरकत नाही. अशी आणखी एक अगदी फिल्मी घटना उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यामध्ये पार पडत असलेल्या एका विवाहसोहोळ्यामध्ये घडली. येथे विवाह विधी सुरु असताना वधूचा पूर्वाप्रेमी अचानक प्रकट झाला. त्याच्या येण्याने एकच गोंधळ उडाला. त्यानंतर वधूच्या नातेवाईकांनी त्याला चांगलाच चोप देऊन लग्नघरातून त्याची हकालपट्टी केली.

उत्तर प्रदेशातील आणखी एका विवाह सोहोळ्यात असे काही घडले, की की ते पाहून परिवारजन आणि पाहुणे मंडळीच्या तोंडचे पाणी पळाले. येथे वर-वधू स्टेजवर बसलेले असताना, मोटरसायकलवर स्वार असलेल्या एका युवकाने एखाद्या फिल्मी हिरोप्रमाणे मंडपामध्ये एन्ट्री मारली. आपल्या हातातील हार त्याने वधूच्या दिशेने भिरकावला, आणि तो हार वधूच्या गळ्यामध्ये नेमका पडला. वधूनेही भरकन उठून आपल्या हातातील हार मोटर सायकलस्वाराच्या गळ्यात अडकविला. हा सर्व प्रकार पाहून संतापलेल्या नातेवाईक मंडळींनी वधूच्या प्रेमिकाला बेदम मारहाण केली.

आणखी एका विवाह्सोहोळ्यामध्ये वधूने वराला हार घालण्यासाठी मान उंचाविली, तिने वराचा चेहरा पहिला मात्र, तिने मोठ्याने किंकाळी फोडली आणि तिची शुद्ध हरपली. हे पाहून तिथे जमलेल्या मंडळींची एकच तारांबळ उडाली. वधूला शुद्ध आल्यानंतर वराचा सावळा वर्ण पाहून तिला धक्का बसल्याचे तिने सांगितले, आणि त्याचबरोबर त्याच्याशी विवाह करण्यास साफ नकार दिला. तिची समजूत काढण्याचा प्रयत्न सर्व नातेवाईक मंडळींनी केला, पण वधू आपल्या हट्टावर ठाम राहिली.

Leave a Comment