पुरातत्व विभागाचा देशातील सर्वात श्रीमंत मंदिराची देखभाल करण्यास नकार


देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या तिरुमला तिरुपति मंदिराची देखभाल करण्याची तयारी दाखवून नंतर त्यावर केंद्रीय पुरातत्व खात्याने (एएसआय) घुमजाव केले आहे. हे मंदिर ताब्यात घेण्याबाबतचे पत्र चुकून पाठवण्यात आल्याचा खुलासा खात्याने केला आहे.

तिरुमला तिरुपति देवस्थानचे (टीटीडी) कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सिंघल यांना एएसआयच्या अधीक्षक आर. श्रीलक्ष्मी यांनी पत्र पाठविले होते. त्यात त्यांनी तिरुमला देवस्थान व तिरुमला गावातील सर्व मंदिराची देखभाल एएसआयकडून केली जाईल, असे म्हटले होते. त्यासाठी त्यांनी टीटीडीकडून या सर्व मंदिरांची माहिती मागविली होती. ही माहिती घेण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याची विनंतीही त्यांनी केली होती.

हे पत्र मिळाल्यानंतर राज्य सरकारने त्याला विरोध केला होता. केंद्र सरकार मंदिरांवर थेट नियंत्रण मिळवू पाहत आहे, असे सरकारने म्हटले होते. भक्तांच्या भावना लक्षात घेऊनच तिरुमला मंदिराबाबत कोणताही निर्णय व्हायला हवा, असे राज्याचे उपमुख्यमंत्री के. ई. कृष्णमूर्ति यांनी म्हटले होते. त्यानंतर एएसआयने शनिवारी हे पत्र परत घेतले, असे हिंदुस्तान टाईम्स वृत्तपत्राने म्हटले आहे.