मणीकरण, येथे शेष नागाच्या फुत्काराने बर्फातही उकळते पाणी


देवभूमी म्हणून ओळख असलेल्या हिमाचल प्रदेशात मणीकरण किंवा मानिकर्ण साहिब नावाचे शीख समुदायाचे पवित्र तीर्थस्थळ आहे. येथे शीख गुरु नानक यांनी ध्यानधारणा आणि चमत्कार केले होते असे सांगितले जाते. मनालीजवळ उंच पहाडात असलेल्या या गुरुद्वारात एक चमत्कार पाहायला मिळतो. तो म्हणजे चोहोबाजूंनी बर्फ असलेल्या या ठिकाणी गरम पाण्याचे कुंड असून या पाण्यामुळे अनेक आजार बरे होतात. हे पाणी गंधकयुक्त आहे. शेषनागाच्या फुत्कारमुळे हे पाणी उकळते असा समज आहे.


समुद्रसपाटीपासून १७६० मीटर उंचीवर कुल्लू पासून ४५ किमीवर हा गुरुद्वारा आहे. येथे एकाचवेळी ४ हजार भाविक राहू शकतात तसेच येथील लंगर साठी या उकळत्या पाण्याच्या कुंडातून पाणी घेतले जाते. या जागेचे नाव मणीकरण कसे पडले याची एक आख्यायिका सांगितली जाते.

११ हजार वर्षापूर्वी शिव पार्वतीने येथे तप केले होते. पार्वती जेव्हा स्नानासाठी गेली तेव्हा तिच्या कानातील डूलाचा एक मणी या ठिकाणी पडला. शंकराचा गणांनी त्याचा शोध घेतला पण तो मिळाला नाही तेव्हा शंकराने तिसरा डोळा उघडला. त्यातून नैनादेवी शक्ती प्रकट झाली आणि तिने हा मणी शेष नागाकडे असल्याचे सांगितले. देवांनी शेषाला मणी परत कर सही प्रार्थना केली तेव्हा त्याने मणी परत दिला पण रागाने असा फुत्कार टाकला कि त्यातून येथे उकळत्या पाण्याचे कुंड तयार झाले. या कुंडातील पाण्याचे तपमान ८६ ते ९८ डिग्री असते आणि ऐन थंडीतही ते गार होत नाही. या पाण्याने स्नान केल्यास रोग बरे होतात आणि मोक्ष मिळतो असा समज आहे.

Leave a Comment