दोन हजाराच्या नोटांची छपाई बंद, १००च्या नोटांची चणचण शक्य


देशात गेल्या आठवड्यात रोकड रकमेची चणचण निर्माण झाली होती ती आता काहीशी कमी झाली असली तरी १०० च्या नव्या नोटा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने पुन्हा एकदा रोकड रकमेची चणचण जाणविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच केंद्रीय वित्त विभागाचे सचिव सुभाश गर्ग यांनी रिझर्व बँकेने २ हजार रुपये मूल्याच्या नोटांची छपाई बंद केल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र ५०० रु. नोटांच्या छपाईचा वेग वाढविला असल्याचा खुलासा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नोटबंदी नंतर रोकड रकमेची कमतरता टाळण्यासाठी जुन्या १०० रु. नोटा नोटा नष्ट न करता चलनात ठेवल्या गेल्या होत्या. त्यातील काही २००५ पूर्वीच्या आहेत. या नोटा एटीएम मध्ये घालणे बँकांना शक्य होत नाही तर काही नोटा मळलेल्या, फाटलेल्या असल्याने ग्राहकांना देता येत नाहीत. अश्या नोटांच्या थप्प्या बँकामधून लागल्या आहेत. त्यामुळे १०० च्या नोटा कमी पडत असून नव्या नोटा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचे रिझर्व बँकेला कळविले गेले आहे.

बँकेतील अधिकारी वर्गाकडून समजते कि १०० च्या नोटा पुरेश्या नसल्याने ५०० रु. नोटांवर दबाब येतो आहे परिणामी या नोटांची साठवण होण्याचा धोका आहे. केंद्राने ५०० रु. च्या नोटांची छपाई वाढविली असून दररोज ३ हजार कोटी मूल्याचा नोटा छापल्या जात आहेत. दोन हजार रुपये मूल्याच्या ७ लाख कोटी नोटा चलनात आहेत त्यामुळे त्यांची छपाई थांबविली गेली आहे.

Leave a Comment