असे बदलणार मेघन मार्कलचे आयुष्य


ब्रिटनच्या शाही घराण्यातील प्रिन्स हॅरीच्या लग्नाचे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. ह्या विवाहाला आता अवघे काही दिवसच उरले असल्याने हा सोहोळा कसा असेल, ह्याबद्दल सर्वांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. प्रिन्स हॅरी, अमेरिकन अभिनेत्री मेघन मार्कल हिच्याशी विवाहबद्ध होत आहे. ब्रिटनच्या शाही घराण्याची सून बनल्यानंतर मेघनच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडून येणार आहे. आजवर अमेरिकेची नागरिक म्हणून स्वतंत्रपणे आयुष्य जगण्याची सवय असलेल्या मेघनला आता ब्रिटीश राजघराण्याच्या रिती आणि परंपरांचे पालन करावे लागणार आहे.

ब्रिटीश राजघराण्यातील परिवारजनांसाठी अनेक अलिखित नियम आहेत. त्यांचे पालन करणे सर्व परिवारजनांसाठी अगत्याचे आहे. आता मेघनला ही ह्या नियमांचे पालन करीत आपल्या जीवनशैलीमध्ये परिवर्तन करावे लागणार आहे. विवाहानंतर मेघन शाही घराण्याची सदस्य बनणार असल्याने तिला आता चित्रपटांमध्ये किंवा मालिकांमध्ये अभिनय करता येणार नाही. ह्या पूर्वी मेघनने अमेरिकन टीव्ही वरील सुप्रसिद्ध्द मालिका ‘ सूट्स ‘ मध्ये अभिनय केला असून, तिची भूमिका अतिशय लोकप्रिय झाली होती. पण मेघन आता ह्या मालिकेमध्ये दिसणार नसली तरी तिच्या उज्ज्वल आणि आनंदी भविष्याची कामना तिचे सहकलाकार करीत आहेत.

आजवर मेघन कामाच्या निमित्ताने, खरेदीच्या निमित्ताने एकटीच बाहेर पडत होती. आता मात्र तिला एकटीला बाहेर पडणे शक्य नसेल, कारण तिच्या बरोबर सतत सुरक्षा कर्मचारी असतील. आत सहज खरेदीला, किंवा बाहेर जेवायला जाणे, सिनेमाला जाणे, भटकंतीसाठी बाहेर पडणे मेघनला शक्य होणार नाही. मेघन ह्या पूर्वी अनेक राजकीय, सामाजिक विषयांच्या बद्दल मोकळेपणाने आपल्या मुलाखतींमध्ये बोलत असे. पण आता शाही घराण्याची सदस्य बनल्यावर तिला आपली राजकीय मते स्वतःपाशीच ठेवावी लागतील. तसेच शाही परिवारातील इतर सदस्यांप्रमाणे मेघनला ही मतदान करता येणार नाही.

विवाहानंतर मेघन चे नाव ही बदलेल. शाही परिवाराचे सदस्य स्वतःच्या पहिल्या नावाचा वापर करतात. त्यामुळे मेघनला आपले ‘मार्कल’ हे आडनाव आपल्या नावातून हटवावे लागेल. मेघनचा जन्म राजघराण्यात झालेला नसल्याने तिला ‘प्रिन्सेस मेघन’ असे म्हटले जाणार नाही. मेघनच्या आयुष्यातील आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे तिचे पोशाख. आता राजघराण्याच्या प्रतिमेला साजेलसे पोशाख मेघनला परिधान करावे लागतील. म्हणजेच आता मनाला येईल तेव्हा, आणि आपल्याला हवे त्या ठिकाणी जीन्स आणि टी शर्ट घालण्याची परवानगी मेघनला नसेल. तसेच मेघन आता शाही घरण्याची सदस्य बनणार असल्यामुळे आपल्या सेल्फी घेऊन मिडीयावर पोस्ट करता येणार नाहीत. इतकेच काय तर शाही घराण्यातील इतर सदस्यांप्रमाणे मेघनला ही ऑटोग्राफ साईन करता येणार नाही.

अभिनेत्री असताना मेघन अनेक मासिकांच्या कव्हर पेजसाठी फोटो शूट करीत असे, पण आता विवाहानंतर मेघनला असे फोटो शूट करता येणार नाहीत. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी मेघनला ‘स्पेशल एअर सर्व्हिसेस’ तर्फे खास प्रशिक्षण दिले जाईल. सर्वात महत्वाचे म्हणजे विवाहानंतर मेघन ब्रिटीश नागरिक बनेल.

Leave a Comment