रत्नीबाईच्या पायात मोदिनी घातलेल्या चपला बनल्या मौल्यवान


छत्तीसगडच्या बिजापूर जांगला कसब्यातील एका कार्यक्रमात १५ एप्रिल २०१८ ला तेंदू पाने गोळा करणाऱ्या रत्नीबाई हिच्यासाठी हा दिवस आयुष्याची आठवण बनला होता. कुणाच्याही परिचयाची नसलेली रत्नीबाई एकदम प्रकाशाच्या झोतात आली. या दिवशी येथील ग्रामस्थांना चप्पल वाटप केले जाणार होते आणि खुद्द पंतप्रधान मोदी तेथे उपस्थित होते. रत्नीबाईला चप्पल देण्यासाठी मंचावर बोलावले गेले आणि अचानक पंतप्रधान मोदी खाली वाकले आणि त्यांनी रत्नीबाईच्या पायात चप्पल घातली. हा भावूक करणारा क्षण रत्नीबाई साठी आयुष्याची शिदोरी बनला.

आज रत्नीबाई चप्पल घालून जंगलात तेंदू पाने गोळा करत असेल असा समज असेल तर तो चुकीचा आहे. रत्नीबाईने मोदींच्या हातून मिळालेल्या या चपला कुलुपात ठेवल्या असून काही विशेष प्रसंगी ती त्या वापरते. घरात एका खोलीत पोत्यात घातलेल्या या चपला रत्नीबाई मधेच बाहेर काढते, पुसते,न्याहळते आणि पुन्हा आत ठेऊन खोलीला कुलूप घालते आणि किल्ली गळ्यात ठेवते.

तिचा मुलगा सांगतो आमच्या घरात चोरीला जाईल असे काही नाही. पण मोदींनी दिलेल्या चपला आता फार मौल्यवान झाल्या असून त्याची राखण करावी लागते. रत्नीबाई सांगते, चपला असल्या म्हणून काय झाले, त्या पंतप्रधान मोदी यांनी दिल्यात त्यामुळे वाटेल तश्या वापरणार नाही.

Leave a Comment