प्रलयंकारी वादळात ताजमहालचा मिनारांचे नुकसान


उत्तर भारतात बुधवारी रात्री झालेल्या तुफानी वादळात आग्रा येथील जागतिक कीर्तीच्या ताजमहालाच्या दोन मिनारांचे नुकसान झाले असल्याचे पुरातत्व विभागाने जाहीर केले. मिळालेल्या माहितीनुसार नैसर्गिक संकटामुळे ताजमहालाला नुकसान पोहोचल्याची हि पहिलीच घटना आहे.

वादळामुळे ताजमहालाचे दोन मिनार हादरले आणि मिनाराच्या वरच्या खिडकीचे नुकसान झाले. विशेष म्हणजे एप्रिल २०१५ च्या भूकंपात ताजमहालाला कोणतीच झळ लागली नव्हती. ताजमहाल बांधताना भूकंप होण्याची शक्यता लक्षात घेऊन मिनार बाहेरच्या बाजूला झुकते बांधले गेले आहेत जेणे करून ते कोसळले तर मुख्य घुमटाला कोणताही अपाय होणार नाही.

या वादळात फत्तेपूर सिक्री येथील ऐतिहासिक सलीम चिस्ती दर्ग्याच्या बादशाही दरवाजाचा सज्ज तुटला तर जनाना रोजाच्या दोन बुरुजांचे सज्जे तुटले आहेत. उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी आज आग्रा येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत.

Leave a Comment