पोहे आपल्या आरोग्यासाठी उत्तम ‘ब्रेकफास्ट फूड’


पोहे आपल्या देशामध्ये बहुतेक ठिकाणी अगदी आवडीने खाला जाणारा पदार्थ आहे. महाराष्ट्रामध्ये पोहे हा खाद्यप्रकार कधी कांदे पोहे, कधी दडपे पोहे तर कधी नुसतेच ताक-पोहे, किंवा दुध पोहे अश्या निरनिराळ्या प्रकारे चवीने खाल्ला जातो. त्यामुळे कधी कांदेपोहे ह्या रूपात तर कधी चमचमीत चिवडा बनून पोहे आपल्या खाद्यसंस्कृतीचा महत्वाचा हिस्सा ठरले आहेत. पोहे हे आपल्याकरिता उत्तम ‘ब्रेकफास्ट फूड’ आहे. त्यामुळे केवळ भारतातील लोकांसाठीच नाही, तर परदेशामध्ये स्थायिक झालेल्या भारतीय लोकांसाठी देखील पोहे हा अन्नपदार्थ महत्वाचा ठरत आहे.
ह्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे, पोहे हा पदार्थ बाजारामध्ये सहज उपलब्ध होणारा, झटपट बनणारा आणि बनविण्यास अतिशय सोपा आहे. त्यामुळे अगदी स्वयंपाक अजिबात न येणाऱ्याला देखील हा पदार्थ बनविणे फारसे अवघड नाही. ह्यामध्ये निरनिरळ्या भाज्या घालून हा पदार्थ आणखी चविष्ट, पोटभरीचा आणि पौष्टिक बनविता येतो. पोहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील फायद्याचे आहेत.

मधुमेहींसाठी पोहे हा पदार्थ उत्तम समजला जातो. ह्यामध्ये फायबर मुबलक मात्रेमध्ये असून, ते सावकाशीने पचतात. त्यामुळे त्याच्या सेवनाने शुगर रक्तामध्ये सावकाश ‘रिलीज’ केली जाते. त्यामुळे ब्लड शुगर एकदम झटक्याने वाढत नाही. पोहे हे एक उत्तम प्रो बायोटिक आहे. साळी पाण्यामध्ये भिजवून, उपसून, उन्हामध्ये वाळवून आणि मग कांडून पोहे तयार केले जातात. पोहे हे पाण्यामध्ये ‘फर्मेंट’ केले गेल्यामुळे त्यामधील मायक्रोब्स टिकून राहतात. हे मायक्रोब्स पोटासाठी आणि पचनक्रियेसाठी चांगले असल्याने पोहे उत्तम प्रो बायोटिक समजले जातात.

पोह्यांच्या मार्फत शरीराला आवश्यक कर्बोदके आणि परिणामी ऊर्जा मिळत असते. पोह्यामध्ये कर्बोदकांची मात्रा ७६.९ टक्के असून, सुमारे २३ टक्के फॅटस् ह्यामध्ये असतात. त्यामुळे दिवसाच्या सुरुवातीला हा पदार्थ नाष्ट्यामध्ये खाल्ल्याने शरीराला कामासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. पोहे पचण्यास ही सोपे असून, ह्यामुळे पोट फुगणे, किंवा अपचन असे विकार उद्भवत नाहीत. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळी जेवणाऐवजी काही तरी हलका आहार म्हणून पोहे हा उत्तम पर्याय आहे. पोह्यामध्ये लोह मुबलक मात्रेमध्ये आहे. त्यामुळे ज्या महिलांना अनिमिया असेल, त्यांनी पोह्यांचे सेवन अवश्य करायला हवे. पोह्यांवर लिंबू पिळून खाल्ल्याने पोह्यातील लोह आपल्या शरीरामध्ये सहज अवशोषित होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment