सार्वजनिक डाटा कार्यालय (पीडीओ) सुरु होण्याचा मार्ग मोकळा; अवघ्या ५ रुपयांत इंटरनेटचा आनंद


नवी दिल्ली- दूरसंचार विभागाने डाटाची पुनर्विक्रीला मंजुरी दिली असल्यामुळे पीसीओ प्रमाणेच सार्वजनिक डाटा कार्यालय (पीडीओ) सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्राँडबँड सुविधा ज्या ठिकाणी आहे, त्या सर्व ठिकाणी पीडीओ सुरु करता येतील. पीडीओ लावण्याच्या कामाला दोन ते तीन महिन्यात सुरुवात होणार आहे. एका वर्षात पीडीओच्या माध्यमातून एक कोटी हॉट स्पॉट लावण्यात येतील अशी अपेक्षा आहे.

याबाबत माहिती देताना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)चे अध्यक्ष आर.एस. शर्मा यांनी सांगितले की, स्वस्त दरावर सामान्य नागरिकाला डाटा सुविधा देण्यासाठी ट्रायने पीडीओ मॉडेलची शिफारस केली होती. पण डाटा पूर्ण विक्रीची (रिसेल) परवानगी देण्याशिवाय हे शक्य नव्हते. दूरसंचार संबंधित प्रकरणातील सर्वोच्च मंडळ “टेलिकॉम कमिशन’ने एक मे रोजी डाटा रिसेल करण्यास मंजुरी दिली आहे. आता या संदर्भात नियम व अटी तयार करण्यात येतील.

ओला आणि उबेरप्रमाणे पीडीओ अॅग्रीगेटर असतील, त्याला अनेक पीडीओ जोडलेले असतील. कोणत्याही ग्राहकाला पीडीओशी जोडावे लागेल. त्यानंतर तो देशातील कोणत्याही ठिकाणी डाटा वापरू शकतो. ग्राहकाला एकदाच सत्यापन करावे लागेल. त्यानंतर तो कोणत्याही पीडीओमधून डाटाचा वापर करू शकेल. केवळ २ ते ५ रुपये ग्राहकाला खर्च करून डाटाचा वापर करता येईल.

ब्राँडबँड कनेक्शन असलेल्या कोणत्याही व्यक्तीला राउटर लावून पीडीओ सुरू करता येईल आणि कोणालाही डाटा विक्री करता येईल. अशा प्रकारच्या पीडीओसाठी त्याला दूरसंचार विभागात आधीच नोंदणी करावी लागेल. ज्या ठिकाणी फिक्स्ड लाइनची सुविधा आहे तेथे १२०० रु. च्या राउटरसह पीडीओ सेवा सुरू करता येईल. विशेष म्हणजे यासाठी वीजेचीही गरज लागणार नाही, त्या ठिकाणी ब्रॉडबँड लाइन असल्यास सौर पॅनलमधूनही पीडीओची सेवा सुरू करता येईल.

Leave a Comment