आपल्या जोडीदाराला अँक्झाईटी डिसॉर्डर असल्यास त्यांना अशी द्या साथ


भारतातील वयाने अठरा वर्षांच्या वर असलेल्या एकूण लोकसंख्येपैकी एकूण चौदा टक्के लोकांना सतत कोणत्या ना कोणत्या काळजीने, भीतीने घेरलेले असते. अश्या व्यक्तींना त्यांच्या ह्या मनस्थिती पायी मनावर सतत दडपण, ताण असतो. ह्यालाच ‘अँग्झाईटी डिसॉर्डर’ असे म्हटले गेले आहे. ह्या व्यक्तींच्या काळजीचे, भीतीचे किंवा विवनंचानांचे रूपांतर कालांतराने गंभीर मानसिक आजारामध्ये होऊ शकते. अठरा वर्षांच्या वर वय असलेल्या एकूण लोकसंख्येपैकी तीन टक्के लोकसंख्या अश्या प्रकारच्या मानसिक आजारांनी ग्रासलेली आहे, असे निदान २०१५ साली प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टमध्ये करण्यात आले आहे. नेमका आकडा सांगायचा झाला तर आपल्या देशामध्ये सुमारे तीन कोटी लोक सततच्या काळजीमुळे उत्पन्न होणाऱ्या मानसिक आजारांनी ग्रासलेले आहेत. आपल्या जोडीदाराच्या बाबतीत देखील आपल्याला हे स्वभाववैशिष्ट्य आढळून आले, तर हा मनोविकार कमी करण्यासाठी आपण ही नक्कीच सहकार्य करू शकता.

सर्वप्रथम अँग्झाईटी डिसॉर्डर अनेक तऱ्हेच्या असतात हे जाणून घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे आपल्या जोडीदाराला नेमकी कोणत्या प्रकारची डिसॉर्डर आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यानुसार त्याची मदत कश्या प्रकारे करायची ह्याचा अंदाज येऊ शकेल. ह्या करिता आपल्या जोदिदाराशी सतत संवाद साधणे महत्वाचे आहे. संवादाच्या माध्यमातून तुमच्या जोडीदाराची मनस्थिती नेमकी कशी आहे ह्याचा अंदाज येऊ शकेल. आपल्या जोडीदाराला वाटणाऱ्या काळजीच्या, किंवा भीतीच्या भावनेकडे दुर्लक्ष करू नये. ‘ सर्व ठीक होईल’ . किंवा ‘उगीच काही तरी विचार करत बसू नका’ असे आपल्या जोडीदाराला म्हणत राहण्यापेक्षा, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही सतत त्यांच्या बरोबरच असाल, असे आश्वासन आपल्या जोडीदाराला वारंवार द्या.

आपल्या जोडीदाराचे म्हणणे नुसते ऐकून घेतले, तरी त्यामुळे देखील त्यांच्या मनावरील दडपण कमी होईल. त्यामुळे त्याचे म्हणणे ऐकून घेऊन, त्यांना तुमच्या कडून कोणत्या प्रकारच्या मदतीची अपेक्षा आहे हे समजून घ्या. तसेच आपल्या बोलण्यातून तुम्ही सतत त्याच्या बरोबर आहात हे दाखवून द्या. त्यांना वाटत असलेल्या काळज्या, चिंता किंवा भीतीमधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही त्याच्या बरोबर आहात हे पटवून द्या. आवश्यकता भासल्यास तज्ञांचा सल्ला घ्या. जर तुमचा जोडीदार तज्ञांची मदत घेण्यासाठी तयार नसेल, तर तशी सक्ती करू नका.

अँग्झाईटी डिसॉर्डर नेहमी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या समवेत असताना, किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यावर ‘ट्रिगर’ होऊ शकते. ह्याबद्दल आपल्या जोडीदाराशी चर्चा करा. त्या विशिष्ट परिस्थितीमधे किंवा त्या विशिष्ट व्यक्तीला भेटल्यावर, त्या विशिष्ट ठिकाणी गेल्यावर जर आपला जोडीदार अस्वस्थ भासू लागला, तर त्याला त्वरित तिथून बाहेर पडण्यास मदत करा.

अँग्झाईटी डिसॉर्डर असेल, तर आपल्या जोडीदाराने धुम्रपान किंवा मद्यपान न करण्याबद्दल आग्रही राहा. धुम्रपान किंवा मद्यपान केल्याने मनावरील तणाव काही काळापुरता कमी होत असला, तरी हा कायमस्वरूपी उपाय नाही. किंबहुना ह्या सवयी भविष्याकाळामध्ये जास्त नुकसान करणाऱ्या ठरू शकतात. अश्या वेळी तज्ञाची मदत जरूर घ्यावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment