ह्या गावातील प्रत्येक घराच्या बाहेर आहे एक कबर !


ह्या गावामध्ये बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये एकच आशंका उत्पन्न होत असते..’ आपण गावामध्ये येण्याऐवजी कुठल्या दफनभूमीमध्ये तर नाही आलो ‘, ही शंका ह्या गावामध्ये शिरता क्षणीच प्रत्येकाच्या मनामध्ये येते. आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील अय्या कोंडा हे असे गाव आहे, जिथे प्रत्येक घराच्या आसपास एक कबर आहे. अय्या कोंडा हे गाव कुर्नुल जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ६६ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका डोंगरावर वसलेले आहे.

ह्या गावामध्ये मालादासरी समुदायाचे एकूण दीडशे परिवार आहेत. कोणाच्या ही नातेवाईकाचे निधन झाले, की त्याला घराच्या बाहेरच दफन करण्याची या गावाची परंपरा आहे. ह्या गावामध्ये वेगळी दफनभूमी अशी नाहीच, त्यामुळे प्रत्येक घराच्या बाहेर एक-दोन कबरी निश्चितच पाहायला मिळतात. घरातून बाहेर पडताना ह्या कबरी ओलांडूनच बाहेर पडावे लागते, तर घरातील लहान मुले ह्या कबरींच्या आसपासच खेळत असलेली पहावयास मिळतात. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ह्या कबरी त्यांच्या पूर्वजांच्या असून, त्यांची दररोज पूजा व्हावी असा येथे दंडक आहे. तसेच ह्या कबरींवर दररोज नैवेद्य, प्रसाद ही चढविला जात असतो. ह्या रीतीचे पालन गावातील प्रत्येक परिवाराकडून आवर्जून केले जाते. घरामध्ये शिजविलेले अन्न कबरींना आधी नैवेद्य म्हणून अर्पण केल्याखेरीज घरातील लोक अन्नाला स्पर्श करीत नाहीत.

ह्या परम्परेशी निगडीत कथा अशी, की आध्यात्मिक गुरु नल्ला रेड्डी आणि त्यांचे शिष्य माला दासरी चिंतला ह्यांनी ह्या गावच्या विकासासाठी आपले आयुष्य वाहिले. त्यांनी गावासाठी आपली सर्व शक्ती, पैसा पणाला लावला. त्यासाठी आभार प्रकट करण्याच्या हेतूने ग्रामस्थांनी त्यांच्या सन्मानार्थ एक मंदिर बनविले, आणि तिथे दररोज पूजा-अर्चा करू लागले. त्याच कारणास्तव घरातील कोणीही वडिलधारे निवर्तल्यानंतर त्यांना मान देण्याच्या उद्देशाने त्यांची कबर घराबाहेर बांधली जाण्याची रीत ह्या गावामध्ये आहे. ह्या कबरी ग्रामस्थांसाठी अतिशय महत्वाच्या आहेत. घरामध्ये कोणतेही शुभकार्य असले, किंवा घरामध्ये कोणतीही नवी वस्तू घेतली, की ती आधी ह्या कबरींवर ठेऊन त्यांचा आशीर्वाद घेण्याची येथील रीत आहे.

Leave a Comment