आपल्याला पडणारी स्वप्ने आहेत कशाची सूचक?


गाढ झोपेमध्ये असताना कुठले तरी स्वप्न पडणे ही अतिशय सामान्य बाब आहे. काही स्वप्ने झोपेतून जागे झाल्यानंतरही आपल्या लक्षात राहतात, तर काहींचा आपल्याला त्वरित विसर पडतो. काही स्वप्नांचा संबंध आपल्या जीवनाशी असतो, तर काही स्वप्नांचा अर्थ आपण लाऊ शकत नाही. मनोविज्ञानाच्या मते, आपल्या अंतर्मनातील विचार स्वनांच्या रूपाने आपल्या समोर येत असतात. काही स्वप्ने चांगली असतात, तर काही स्वप्ने मन अस्वस्थ करणारी, किंवा मनामध्ये भीती उत्पन्न करणारी असतात. काही तज्ञांचे मत विचारात घेतले, तर त्यांच्या मतानुसार प्रत्येक स्वप्नाला काही ना काहीतरी अर्थ असून, प्रत्येक स्वप्न कुठल्यातरी गोष्टीचे सूचक आहे. त्यामुळे आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांवरून आपल्या आयुष्यामध्ये पुढे काही आनंदाची बातमी समजणार आहे, किंवा पडलेले स्वप्न कुठल्या धोक्याचा इशारा आहे हे जाणून घेता येणे शक्य आहे.

स्वप्नांमध्ये जर हिरवीगार कुरणे किंवा शेते किंवा हिरवळ दिसली, तर ह्याचा अर्थ आपल्यालाही आयुष्यामध्ये लवकरच सुबत्ता, भरभराट येणार आहे असा आहे. तसेच भविष्यामध्ये धन प्राप्ती होऊन समाधान नांदेल असा ह्या स्वनाचा अर्थ असल्याचे तज्ञ म्हणतात. तसेच एखाद्या महिलेला, ती सफरचंद खात आहे असे स्वप्न पडले असल्यास लवकरच संतती प्राप्त होणार असल्याचे, हे स्वप्न सूचक आहे.

अनेकदा स्वप्नामध्ये सर्प दृष्टीस पडतात. त्यामुळे घाबरून जाऊन अश्या स्वप्नाला अशुभ समजले जाते. पण खरे तर स्वनामध्ये सर्प दिसणे हा शुभ संकेत मानला गेला आहे. स्वनामध्ये सर्प दिसला, तर घरामध्ये कोणी पाहुणा येणार असल्याचे ते सूचक आहे. तसेच जर स्वप्नामध्ये डाळिंब दिसले, तर भविष्यामध्ये लवकरच धनलाभ होणार असल्याचा हा संकेत आहे. तसेच स्वप्नामध्ये डाळिंब दिसणे संतती प्राप्तीचे देखील सूचक आहे.

स्वनामध्ये कुंभार मातीचे भांडे बनविताना दिसला, तर भविष्यामध्ये धनलाभ होणार असल्याचा हा संकेत मानला जातो. तसेच पिकलेल्या फळांनी लगडलेली झाडे किंवा धान्याने, विशेषतः गव्हाने भरलेली शेते दिसणे हे देखील धनलाभाचे सूचक आहे. स्वप्नामध्ये काडेपेटीतील काडी पेटविताना स्वतःला पाहणे हा देखील धनलाभाचा संकेत मानला गेला आहे.