हाताच्या बोटामध्ये तांब्याची अंगठी धारण करण्याचे फायदे


आपल्या कुंडलीमध्ये असलेल्या ग्रहदोषांची शांत करण्याकरिता हाताच्या बोटांमध्ये अनेक प्रकारच्या धातूंनी बनलेल्या अंगठ्या धारण करण्याचा, तसेच निरनिरळ्या प्रकारची रत्ने धारण करण्याचा सल्ला दिला जातो. निरनिराळे धातू निरनिराळ्या ग्रहांचे प्रतीक आहेत. सर्व ग्रहांचा राजा सूर्य आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये तांबे हे सूर्याचा धातू मानले गेले आहे. सूर्याशी निगडीत सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी तांब्याने बनलेली अंगठी धारण करण्याचा सल्ला दिला जातो. तांब्याची अंगठी धारण करण्याचे फायदे जाणून घेऊ या.

तांबे हे सूर्याचे प्रतीक असल्याने तांब्याची अंगठी सूर्य दर्शविणाऱ्या बोटामध्ये, म्हणजेच अनामिकेमध्ये धारण केली पाहिजे. ह्यामुळे पत्रिकेमध्ये असलेले सूर्याचे दोष कमी होण्यास मदत होते. तांब्याची अंगठी धारण केल्याने पोटाशी निगडीत विकार कमी होतात. त्यामुळे ज्यांना पोटाशी, पचनक्रियेशी निगडीत काही विकार वारंवार उद्भवत असतील, त्यांनी तांब्याची अंगठी अनामिकेमध्ये धारण करावी.

तांबे अंगठी रूपाने बोटामध्ये धारण केले असता, ते सतत आपल्या शरीराच्या संपर्कात राहते. त्यामुळे त्यातील औषधी गुण शरीराला प्राप्त होतात. रक्त शुद्धीकरिता देखील तांब्याची अंगठी धारण करणे उत्तम आहे. ज्याप्रमाणे तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी आपल्या शरीरासाठी उत्तम आहे, त्याचप्रमाणे तांब्याची अंगठी धारण करणे देखील आरोग्यवर्धक आहे.

तांब्याची अंगठी धारण केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच ही अंगठी धारण केल्याने त्वचा अधिक सुंदर, नितळ दिसू लागते. सूर्य यशवर्धन करणारा आणि मान-सन्मान मिळवून देणारा आहे. त्यामुळे तांब्याची अंगठी धारण केली गेल्यास व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनते, व्यक्ती यशस्वी होते आणि समाजामध्ये प्रतिष्ठा आणि सन्मान लाभतो.

तांब्याची अंगठी धारण केल्याने हृदयाशी निगडीत समस्या उद्भविण्याची शक्यता कमी होते. तसेच ही अंगठी धारण केल्याने शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होतो. ज्या व्यक्ती शीघ्रकोपी असतील, म्हणजेच ज्या व्यक्तींना लहान सहान कारणांवरून राग येत असेल, ज्यांना आपला राग आवरता येत नसेल, अश्या व्यक्तींनीही तांब्याची अंगठी धारण करायला हवी. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये कॉपरची कमतरता आहे, त्यांनी ही तांब्याची अंगठी धारण करावी.

Leave a Comment