जाणून घेऊ या ‘डर्मारोलिंग’ बद्दल


त्वचेची निगा राखण्यासाठी अनेक प्रकारच्या ब्युटी ट्रीटमेंटस् उपलब्ध आहेत. ह्यामधीलच, सध्या अतिशय लोकप्रिय होत असलेली ट्रीटमेंट म्हणजे डर्मा रोलिंग. ही ब्युटी ट्रीटमेंट जेव्हा अस्तित्वात आली, तेव्हा ह्याबद्ल फारशी माहिती नसल्याने, ह्या ट्रीटमेंटला फारशी मागणी नव्हती. पण अलीकडच्या काळामध्ये, अनेक सुपरस्टार्स ह्या ट्रीटमेंटचा वापर करीत असून, ही ट्रीटमेंट खरोखर फायद्याची ठरत आहे हे लक्षात आल्यानंतर डर्मा रोलिंग लोकप्रिय होत आहे.

डर्मा रोलर म्हणजे नेमके काय? तर हे असे उपकरण आहे, ज्याला एका हँडल ला एक लहानसे चाक लावलेले असते. ह्या चाकाला अतिशय सूक्ष्म सुया लावलेल्या असतात. ह्या सुयांचा उपयोग चेहऱ्यावरील त्वचेला हलकेच टोचण्यासाठी होतो. हे एक प्रकारचे ‘मायक्रो नीडलिंग डिव्हाईस’ असून, ह्याच्या मदतीने त्वचेवर अतिशय सूक्ष्म छिद्रे केली जातात. ह्याद्वारे त्वचेमधील इलास्टीसीन आणि कोलाजेन तयार होण्याचे प्रमाण वाढून त्वचा नितळ आणि अधिक मुलायम होण्यास मदत होते. ह्या उपकरणावर असलेल्या एका सुईचा साईझ ०.१ मिलिमीटर इतका असतो.

ज्या व्यक्तींच्या त्वचेवर खूप डाग आहेत, किंवा ज्यांच्या त्वचेचा पोत काही कारणाने खराब झालेला आहे, त्यांना डर्मा रोलिंग च्या मदतीने सुंदर, नितळ त्वचा मिळविता येऊ शकते. तसेच चेहऱ्यावरील त्वचा वयपरत्वे ढिली पडत गेल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. डर्मा रोलिंग मुळे त्वचेमध्ये इलास्टीसीन आणि कोलाजेन तयार होत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होऊ लागतात. त्यामुळे ज्यांना आपली त्वचा ‘टाईटन’ करायची आहे, म्हणजेच ढिली पडलेली त्वचा पुन्हा पूर्ववत करायची आहे, त्यांनाही डर्मा रोलिंगने फायदा होतो. डर्मा रोलिंग मुळे त्वचेवरील रंध्रे खुली होतात. ज्यांना डर्मा रोलिंगचा वापर कार्याचा आहे, त्यांनी सुरुवातीला आठवड्यातून एकदा ह्याचा वापर करावा, मग जशी सवय होईल, तसतसा वपर वाढवावा. त्यानंतर आठवड्यातून किमान तीन वेळा डर्मा रोलिंग करावे. साधारण दोन महिने ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्वचेवर इच्छित बदल दिसून येतील.

डर्मा रोलरचा वापर करताना सर्वप्रथम कपाळावर हा रोलर आडवा फिरवावा. त्यानंतर गाल आणि मग हनुवटीवर हा रोलर फिरवायचा आहे. त्यानंतर हा रोलर आधी चेहऱ्यावर डावीकडे आणि मग उजवीकडे उभा फिरवायचा आहे. यानंतर क्रॉस च्या आकारामध्ये हा रोलर चेहऱ्यावर फिरवायचा आहे. रोलर चेहऱ्यावर फिरवताना तो डोळ्यांच्या जवळील नाजूक त्वचेला नुकसान करणार नाही ह्याची काळजी घ्यावी. घरामध्ये स्वतः डर्मा रोलारचा वापर करण्याऐवजी सुरुवातीला ह्या कामी तज्ञांची मदत घेणे उत्तम. तसेच इतर कोणी वापरलेला डर्मा रोलर वापरणे आवर्जून टाळायला हवे.

Leave a Comment