आपल्या ऑफिसच्या कॉम्प्युटरचा वापर ह्या गोष्टी करण्यासाठी टाळा


आपल्यापैकी अनेक लोक असे असतील ज्यांना नोकरीच्या ठिकाणी संगणकाचा वापर करणे आवश्यक असेल. आजकाल बहुतेक ठिकाणी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप कामासाठी वापरला जात असतो. पण अनेकदा अनेक व्यक्ती कामासाठी म्हणून वापरण्याच्या संगणकाचा उपयोग इतर काही गोष्टी करण्यासाठी करीत असतात. ह्या गोष्टींसाठी ऑफिसमधील संगणकाचा वापर आवर्जून टाळायला हवा.

आपण वापरत असलेल्या ऑफिसमधील संगणकावर आपल्या कुठल्याही प्रकारच्या व्यक्तिगत फाईल्स सेव्ह करू नका. तसेच तुम्ही काम करीत असलेल्या कोणत्याही खास प्रकल्पासंबंधीची माहिती ऑफिसमधील संगणकावर स्टोर करू नका. जर तुम्ही ही खबरदारी घेतली नाही, तर तुमच्या कल्पना तुम्ही सर्वांसमोर मांडण्याआधीच ह्या कल्पना इतरांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. जर असे झाले, तर तुमच्या प्रकल्पाबद्दलची सर्व माहिती ‘लीक’ होऊन, तुम्ही त्या प्रकल्पावर घेत असलेली मेहनत निरुपयोगी ठरेल.

आजकाल मोठमोठ्या कंपन्यांमध्ये केवळ कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी काही व्यक्ती कार्यरत असतात. कोणता तसेच कोणता कर्मचारी ऑफिसवरील संगणकाच्या माध्यमातून कोणती वेबसाईट सर्च करीत आहे, ह्यावरही कंपनीचे बारीक लक्ष असते. त्यामुळे ऑफिसचा कॉम्प्युटर वापरून आपण आपली खासगी कामे करू नयेत. तसेच खासगी स्वरूपाच्या ई मेल पाठविण्यासाठी किंवा वाचण्यासाठी देखील ऑफिसच्या कॉम्प्युटरचा वापर करणे टाळावे. तसेच ऑनलाईन खरेदी करण्याकरिताही ऑफिसचा संगणक वापरण्याचे टाळावे.

आजकाल संगणकाचा वापर करीत असताना त्याच्या जोडीने संगणकाच्या माध्यमातूनच व्यक्तिगत ‘ चॅट ‘ देखील होत असतात. असे करीत असताना आपण पाठविलेला व्यक्तिगत स्वरूपाचा मेसेज ऑफिसमधील चॅट ग्रुपवर नजरचुकीने पाठविला जाऊन फजिती होण्याचा प्रसंग अनेकदा येत असतो. त्यामुळे आपल्या व्यक्तिगत चॅट साठी ऑफिसमधील संगणकाचा वापर करू नका. तसेच ऑफिसमधील संगणकावर असलेल्या चॅट ग्रुपमध्ये केवळ कामासंबंधीच चर्चा करा. तुम्ही वापर करीत असलेल्या संगणकाची आणि तुम्ही तो कसा वापरत आहात, ह्याची सविस्तर माहिती कंपनीकडे असतेच.

जर तुम्ही दुसऱ्या नोकरीच्या शोधात असाल, तर त्यासाठी अर्ज करणे, किंवा अनेक वेबसाईटस् वर नोकरी शोधणे हे काम ऑफिसच्या संगणकावर चुकुनही करू नका. जर तुम्ही इतरत्र नोकरी शोधत आहात हे तुमच्या संगणकाच्या सर्च इंजिन्स वरून तुमच्या वरिष्ठांच्या लक्षात आले, तर तुम्ही त्यांना तशी कल्पना देण्याआधीच त्यांना हे समजल्यामुळे अनावश्यक गैरसमज ओढवतील, आणि परिस्थिती चमत्कारिक होऊन बसेल. तसेच तुमच्याबद्दल तुमच्या वरिष्ठांच्या मनामध्ये शंका उत्पन्न होईल. त्यामुळे इतरत्र चांगली नोकरी शोधण्यासाठी ऑफिसमधील संगणक वापरणे आवर्जून टाळा.

Leave a Comment