गायत्री मंत्राच्या उच्चारणाचे फायदे


शास्त्रांमध्ये गायत्री मंत्र हा सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मंत्र म्हटला गेला आहे. गायत्री मंत्राला ‘वेदमाता’ म्हणून संबोधले गेले आहे. पूर्वीच्या काळी संध्याकाळच्या वेळी परवचा म्हणताना किंवा संध्या करताना गायत्री मंत्राचे उच्चारण हमखास केले जात असे. आताच्या काळामध्ये ही पद्धत लुप्त होत चालली असली, तरी गायत्री मंत्राच्या उच्चारणाने किंवा जपाने घरामध्ये आणि व्यक्तीच्या शरीरामध्ये सकारत्मक ऊर्जेचा संचार होऊन कठीण परिस्थितीवर मात करता येते, असा उल्लेख शास्त्रांमध्ये आहे.

गायत्री मंत्राचा जप सुरु करावयाचा असल्यास तो सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी सुरु करायला हवा. त्यानंतर दुपारी आणि मग सायंकाळी सूर्यास्ताच्या काही वेळ आधी गायत्री मंत्राचा जप केला जावा असा नियम आहे. ह्या नियमांप्रमाणे केला जाणारा जप शुभ फल देणारा आहे.

ज्या व्यक्तींना सतत काही ना काही कारणाने काही कौटुंबिक अडचणींना तोंड द्यावे लागत असेल, किंवा सतत व्यवसायामध्ये नुकसान होत असेल, त्यांच्यासाठी गायत्री मंत्राचा जप करणे लाभकारी ठरते. तसेच नोकरीच्या ठिकाणी मनासारखे यश मिळत नसेल, किंवा सतत काही ना काही कारणांनी मनस्ताप होत अईल, तर अश्या व्यक्तींनी देखील गायत्री मंत्राचा जप करावा. त्यामुळे त्यांना होत असलेला मनस्ताप, आणि नोकरीच्या ठिकाणी येत असणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होईल.

गायत्री मंत्रामध्ये एकूण चोवीस अक्षरे आहेत. ही चोवीस अक्षरे, चोवीस शक्ती आणि सिद्धींचे प्रतीक आहेत. ह्याच कारणास्तव ऋषी मुनींनी गायत्री मंत्र, भौतिक जगामध्ये सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण करणारा आहे असे म्हटले आहे. विद्यार्थ्यांकरिता ही ह्या मंत्राचा जप अतिशय लाभकारी आहे. गायत्री मंत्र हा सद्बुद्धीचा मंत्र असून, ह्या मंत्राला सर्व मंत्रांचा ‘मुकुटमणी’ म्हटले गेले आहे.

Leave a Comment