केदारनाथ धाम बद्दल काही रोचक तथ्ये


भगवान केदारनाथांचे मंदिर आता भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाल्यानंतर केदारनाथ यात्रा औपचारिक रित्या सुरु झाली आहे. आता पुढील पाच ते सहा महिने केदारनाथांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. अतिशय पुण्यकारक अशी ही यात्रा समजली जाते. दरवर्षी देश विदेशातून अनेक भाविक ह्या यात्रेमध्ये आवर्जून सहभागी होत असतात. अश्या ह्या केदारनाथ धाम बद्दल काही रोचक तथ्ये खास माझा पेपरच्या वाचकांसाठी.

केदारनाथ देवस्थान समुद्र सपाटीपासून ३५९३ फुटांच्या उंचीवर वसलेले आहे. इतक्या उंच ठिकाणी ह्या मंदिराचे निर्माण केले जाणे हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. हे निर्माण कसे काय करण्यात आले असेल, ह्याची पुरती कल्पना अजूनही कोणी करू शकलेले नाही. येथे विराजमान केदारनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहेत. मंदिराचे निर्माण नेमके कोणी करविले ह्याचा कोणताही स्पष्ट उल्लेख आढळत नसला, तरी आदी शंकराचार्यांनी ह्या मंदिराची स्थापना केली असल्याचे म्हटले जाते.

ह्या मंदिरामध्ये पूजिले जाणारे केदारनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहेत. पहाटे ह्या शिवपिंडीला स्नान घालून ह्यावर तुपाचा लेप चढविला जातो. त्यानंतर यथासांग पूजा होऊन आरती होते. त्यानंतर आलेले भाविक, केदारनाथांचे, मंदिराच्या गाभाऱ्यातून दर्शन घेतात. संध्याकाळी मात्र केदारनाथ शिवपिंडी सजविली जाते. ह्यामध्ये विविध आकर्षक रंगसंगतीच्या मदतीने ही सजावट केली जाते. ह्यावेळी भाविकांना गर्भगृहामध्ये प्रवेश करता येत नाही. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी आलेल्या भाविकांना दुरूनच दर्शन घेता येते.

ह्या मंदिरामध्ये पूजा अर्चा करणारे पुजारी म्हैसूरचे जंगम ब्राह्मणच असतात. वृषभाच्या पाठीसम दिसणारी केदारनाथची शिवपिंडी आहे. असे म्हणतात, की जेव्हा पांडव शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचा शोध घेत होते, तेव्हा शंकरांनी वृषभाचे रूप धारण केले. जेव्हा शंकर वृषभाचे हे रूप घेऊन अंतर्ध्यान पावले, तेव्हा त्यांच्या शरीराचा वरचा भाग पशुपतीनाथाच्या रूपाने नेपाळ मधील काठमांडू येथे प्रकट झाला. शंकरांच्या भुजा तुंगनाथ येथे, तर मुख रुद्रनाथ येथे प्रकट झाले. शंकरांची नाभी मदमदेश्वर येथे, तर जटा कल्पेश्वर येथे प्रकट झाल्या. शंकरांच्या पाठीचा भाग केदारनाथ येथे आहे असे म्हणतात. म्हणूनच ह्या पाचही ठिकाणांना मिळून ‘पंचकेदार’ असे म्हटले जाते. ह्या सर्व ठिकाणी शंकरांची भव्य देवस्थाने आहेत.

केदारनाथ यात्रेच्या वेळी सकाळी सात वाजल्यापासून भाविकांना मंदिरामध्ये दर्शन घेता येते. दुपारी एक ते दोन ह्या वेळामध्ये मंदिरामध्ये विशेष पूजा असते. त्यानंतर दुपारच्या विश्रांतीसाठी मंदिर बंद केले जाते. संध्याकाळी पाच वाजल्यापासून मंदिरामध्ये दर्शन घेता येऊ शकते. पंचमुखी शिवप्रतिमेचा विधिवत शृंगार करून संध्याकाळी साडेसात ते साडेआठ ह्या वेळामध्ये आरती केली जाते. त्यानंतर साडेआठ वाजता मंदिर बंद होते.

थंडीच्या दिवसांमध्ये केदारनाथ बर्फाच्छादित असते. केदारनाथ मंदिराचे दरवाजे शीत ऋतू मध्ये भाविकांसाठी बंद करण्याचे आणि यात्रेसाठी पुन्हा उघडण्याचे मुहूर्त काढले जातात. शीत ऋतूमध्ये साधारण नोव्हेंबर महिन्याच्या पंधरा तारखेच्या आसपास हे मंदिर दर्शनासाठी बंद होते. त्यांनतर सहा महिन्यांनी, म्हणजेच साधारण पंधरा ते वीस एप्रिलच्या सुमाराला मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडले गेले, की केदारनाथ यात्रेला सुरुवात होते. मंदिराची द्वारे उघडल्यानंतर येथील शिवप्रतिमा उखीमठामध्ये आणली जाते. येथील रावल ह्या प्रतिमेची पूजा करतात. येथे येणाऱ्या भाविकांना पूजा करण्यासाठी त्यांच्या इच्छेप्रमाणे रोख रक्कम देता येऊ शकते.

ह्या ज्योतिर्लिंगाची कथा अशी, की हिमालयातील केदार नामक शृंगावर नर आणि नारायण नामक ऋषी तपस्या करीत असत. त्यांच्या ह्या तपस्येवर प्रसन्न होऊन शंकर प्रकट झाले, आणि दोघा ऋषींच्या विनंतीनुसार ज्योतिर्लिंगाच्या रुपात येथे वास करून राहिले. म्हणून ह्या स्थानाला केदारनाथ असे नाव मिळाले आहे.

Leave a Comment