ही आहेत भारतातील ‘झपाटलेली’ हिल स्टेशन्स


भारतामध्ये दोनशे पेक्षा जास्त हिल स्टेशन्स आहेत. ही बहुतेक सर्व हिल स्टेशन्स पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. पण ह्यातील काही हिल स्टेशन्स अशी आहेत, जिथे गेल्यानंतर पर्यटकांना काही विचित्र घटना अनुभवायला मिळाल्या आहेत. त्यामुळे ह्या हिल स्टेशन्स वर कुठली तरी नकारात्मक शक्ती असावी अशी सर्वसाधारण समजूत झाली आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींना अश्या वातावरणाबद्दल किंवा अश्या घटनांबद्दल कुतूहल आहे, त्यांनी ह्या ठिकाणांना अवश्य भेट द्यावी.

पश्चिम बंगालमध्ये कुर्सेओंग हे हिल स्टेशन दार्जीलिंग जिल्ह्यात आहे. वर्षभर येथे अतिशय चांगले हवामान असल्याने सर्वच ऋतुंमध्ये पर्यटकांची गर्दी येथे पाहायला मिळते. येथे असणारे ‘डाऊन हिल’ हे ठिकाण ‘झपाटलेले’ आहे असे म्हटले जाते. येथील स्थानिक रहिवाश्यांच्या मते येथे कोणाचा तरी पायरव सतत ऐकू येत असतो. काही वर्षांपूर्वी येथे काही व्यक्तींना आलेल्या अपघाती मृत्यूंची कारणे शोधाअंती देखील सापडली नाहीत. त्यामुळे हा परिसर नकारात्मक शक्तींनी झपाटलेला असावा अशी येथील रहिवाशांची समजूत आहे.

उत्तराखंड येथील मसुरी हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय लोकप्रिय आहे. उत्तराखंडातील देहराडून जिल्ह्यामध्ये हे हिल स्टेशन समुद्र सपाटीपासून दोन हजार फुटांच्या उंचीवर वसलेले आहे. येथे असणाऱ्या ‘लांबी देहर’ खाणी ‘झपाटलेल्या’ आहेत असे म्हटले जाते. येथे आधी लाईमस्टोनच्या खाणी असत. अनेक वर्षांपूर्वी येथे झालेल्या एका भीषण अपघातामध्ये येथील अनेक खाण कामगारांचा मृत्यू झाला होता. त्या घटने नंतर अनेक गाड्या, ट्रक अशी वाहने, कोणतेही कारण नसताना अचानक दरीमध्ये कोसळू लागले. त्यानंतर हा परिसर नकारात्मक शक्तींनी व्यापलेला असावा अशी खात्री येथील रहिवाश्यांना पटली. आताच्या काळामध्ये गाड्यांना ह्या भागामध्ये अपघात झाले नसले, तरी येथे पायी फेरफटका मारताना अजूनही किंकाळ्यांचे कर्कश आवाज ऐकू येत असल्याचे अनेक लोकांचे म्हणणे आहे.

‘क्वीन ऑफ हिल स्टेशन्स’ ह्या नावाने संबोधले जाणारे शिमला हे हिल स्टेशन पर्यटकांची पहिली पसंती आहे. हिमाचल प्रदेशमध्ये असलेले हे हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून २२०० फुटांच्या उंचीवर आहे. ब्रिटीशांच्या काळी हे हिल स्टेशन येथील उत्तम हवामानामुळे, ब्रिटीशांचे ‘समर कॅपीटल’ म्हणून ओळखले जात असे. पण येथील शिमला-कालका रेल्वे मार्गावरील ३३ क्रमांकाचा बोगदा झपाटलेला आहे असे म्हटले जाते. ब्रिटीश राजवटीतील अधिकारी कर्नल बारोग यांनी ह्या बोगद्यामध्ये आत्महत्या केली असे म्हणतात. तेव्हापासून ह्या कर्नलसाहेबांचा आवाज, ह्या बोगद्यातून येणाऱ्या-जाण्याऱ्या मंडळींशी गप्पा मारताना ऐकल्याचा अनेकांचा अनुभव आहे. मात्र आजवर ह्या शक्तीने कोणाचे कधीही कसल्याही प्रकारचे नुकसान केलेले नाही.

महाराष्ट्रातील लोणावळा हे हिलस्टेशन मुंबई पासून ९६ किलोमीटर अंतरावर आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेले असे हे हिलस्टेशन पावसाळ्याच्या काळामध्ये अतिशय लोकप्रिय पर्यटनस्थळ असते. येथे असलेल्या हॉटेल राजकिरणच्या रिसेप्शन काऊंटर जवळील खोलीमध्ये सतत कोणी तरी असल्याची जाणीव हॉटेल मधील कर्मचाऱ्यांना आणि येथे येणाऱ्या पाहुण्यांना होत असते. पण पाहायला जावे, तर ह्या खोलीमध्ये कोणीच सापडत नाही. मात्र येथे सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या हालचाली जाणवत राहतात. ह्या मागचे नेमके कारण कोणी सांगू शकत नसले, तरी हे हॉटेल देखील झपाटलेल्या ठिकाणांच्या यादीमध्ये आहे, एवढे मात्र नक्की.

Leave a Comment