ही लक्षणे मधुमेहाची सुरुवात तर नाहीत?


अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ( सीडीसी ) च्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील ३०.३ मिलियन लोक मधुमेहाच्या व्याधीने ग्रस्त आहेत. ह्यामध्ये देखील सुमारे २७ मिलियन व्यक्तींना मधुमेह असल्याचे खात्रीशीर निदान झाले आहे, तर सुमारे ३ मिलियन व्यक्तींना आपल्याला मधुमेह असल्याची ओझरती देखील कल्पना नसल्याचे म्हटले आहे. तसेच सुमारे ३३ मिलियन लोकांना मधुमेहाचे पक्के निदान होण्यासाठी पूरक अशी लक्षणे जाणवत आहेत असे सीडीसीच्या सर्वेक्षणामध्ये म्हटले आहे. भारतामध्ये देखील मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांची संख्या झपाट्याने वाढते आहे. आता ही व्याधी वयस्क लोकांप्रमाणे अगदी तरुण, लहान वयातील व्यक्तींमध्येही दिसून येऊ लागली आहे.

पुष्कळदा मधुमेहाचे निदान होण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला देत असलेली धोक्याची सूचना आपल्या लक्षातच येत नाही. मधुमेह उद्भविणार असल्याची निश्चित लक्षणे किंवा बदल आपल्या शरीरामध्ये घडून येत असतात. ह्यांकडे जर वेळीच लक्ष दिले, तर पुढील उपाययोजना तातडीने करून ह्या व्याधीचे लवकर निदान होऊन त्यावर नियंत्रण मिळविण्यात यश येऊ शकते. बहुतेकवेळी ही लक्षणे इतकी किरकोळ असतात, की ही लक्षणे इतक्या मोठ्या व्याधीची सूचक आहेत ही शक्यता विचारातच घेतली जात नाही. आणि जेव्हा लक्षणे बळावतात, तेव्हा व्याधीने शरीरामध्ये घर केलेले असते, आणि त्यामुळे कायमस्वरूपी औषधोपचार घेण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे वेळीच खबरदारी घेणे अगत्याचे आहे.

आपण खात असलेल्या अन्नाचे परिवर्तन ग्लुकोजमध्ये होते. हे ग्लुकोज आपल्या शरीरातील कोशिकांना ऊर्जा देत असते. पण ग्लुकोजचे रुपांतर ऊर्जेमध्ये होण्यासाठी इंस्युलीनची आवश्यकता असते. जर कोशिका इंस्युलीन ‘रेसिस्ट’ करू लागल्या, म्हणजेच कोशिका इंस्युलीनला बाधक ठरू लागल्या, तर त्यांना उर्जाही मिळत नाही. परिणामी शरीरामध्ये ऊर्जा कमी होऊन सतत थकवा जाणवू लागतो. सतत थकवा जाणविणे हे मधुमेहाचे लक्षण आहे. सामान्य प्रकृतीच्या मनुष्याला चोवीस तासांमध्ये चार ते पाच वेळी लघवीला जाण्याची आवश्यकता भासते. पण ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, त्यांची ब्लडशुगरची पातळी वाढलेली असते. ही पातळी खाली आणणे किडनीकरिता शक्य होत नाही, त्यामुळे शरीराला अधिक द्रव पदार्थांची आवश्यकता भासते. परिणामी वारंवार तहानेची भावना होऊन पाणी जास्त प्यायले जाते, आणि म्हणूनच वारंवार लघवीची भावना होणे, हे देखील मधुमेहाचे लक्षण आहे.

वारंवार लघवी होत असल्यामुळे रक्तातील साखर ह्या लघवीवाटे बाहेर टाकली जाते. परिणामी वजन घटू लागते. तसेच जर मधुमेह असला, तर त्यामुळे आपण खात असलेल्या अन्नातील साखर आपल्या शरीरातील कोशिकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे शरीराला आवश्यक कॅलरीज मिळत नाहीत. ह्यामुळे ही वजन झपाट्याने कमी होऊ लागते. त्यामुळे वजन झपाट्याने कमी होऊ लागल्यास रक्ताची तपासणी करून घेणे इष्ट आहे. सतत तोंडाला, घशाला कोरड पडणे हे ही मधुमेहाचे लक्षण आहे. रक्तामध्ये साखरेची पातळी जास्त असेल, तर शरीरातील अनेक टिश्यू मधील फ्लुईडस् घेतले जातात. ही फ्लुईडस् डोळ्यांतील टिश्यू मधून देखील घेतली जात असतात. परिणामी दृष्टीदोष, डोळ्यांचे विकार उत्पन्न होऊ लागतात.

जर शरीरावर एखादी जखम झाली, तर ती लवकर भरून न येणे हे देखील मधुमेहाचे लक्षण आहे. त्याचप्रमाणे हातापायांना सतत मुंग्या येणे, हात पाय बधीर होणे हे देखील मधुमेहाचे लक्षण असू शकते. मधुमेह उद्भविणार असेल, तर त्वचेवरही ह्याची लक्षणे दिसून येऊ लागतात. ह्यामध्ये मानेवर, किंवा बगलांमध्ये त्वचेवर काळे चट्टे पडू लागतात. हे ही मधुमेहाचे लक्षण आहे. ह्यांपैकी कोणीही लक्षणे दिसून आली, तर त्वरित तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही