घराच्या मुख्य द्वारावर गणेश प्रतिमा कशी लावावी?


आपल्याकडे गणपती हे विघ्नहर्ता, सुखकर्ता म्हटले गेले आहेत. प्रत्येक कार्याची सुरुवात आपल्याकडे गणेश अर्चेने होत असते. तसेच घराच्या प्रवेश द्वारावरही गणेशाची प्रतिमा लावली जाते. त्यासोबत स्वस्तिक इत्यादी शुभचिन्हेही आवर्जून लावली जातात. ह्यामागचे कारण हे, की घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी, कोणतेही विघ्न घरामध्ये येऊ नये आणि संपत्ती, भाग्य ह्यांच्या आगमनाने घरामध्ये भरभराट असावी, देवाचा आशीर्वाद सदैव आपल्या वास्तूवर असावा, असा यामागील उद्देश आहे. मात्र घराच्या प्रवेशद्वारावर गजाननाची प्रतिमा लावताना, काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

घरामध्ये सुख-समृद्धी, शांतता, प्रसन्नता नांदावी ह्याकरिता तांबड्या रंगाची गणेश प्रतिमा लावणे अतिशय शुभ मानले जाते. ह्या गजाननाची प्रतिमा असणाऱ्या घरातील सदस्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते. घराच्या प्रवेशद्वारावर गणेशाची प्रतिमा लावल्यावर तिथे सदैव स्वच्छता असेल, ह्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे घराच्या प्रवेशद्वाराच्या आसपास कोणत्याही प्रकारचा केर कचरा, किंवा कचऱ्याची बादली ठेऊ नये.

घराच्या प्रवेशद्वारावर गणेशाची प्रतिमा लावल्यानंतर दारच्या आतल्या बाजूला ठीक त्याच ठिकाणी गणेशाची आणखी एक प्रतिमा लावावी. म्हणजे ह्या दोन्ही प्रतिमा पाठीला पाठ लावल्याप्रमाणे भासावयास हव्यात. त्याचप्रमाणे घरामध्ये कुठल्याही भागामध्ये वास्तुदोष असेल तर त्या ठिकाणी कुंकवामध्ये तूप घालून, ह्या मिश्रणाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढावे. ह्याने घरातील त्या भागाचा असलेला वास्तुदोष नाहीसा होईल.

प्रवेशद्वारावरील लावलेली गणेशाची प्रतिमा किंवा ठेवलेली मूर्ती बैठी असावी. ह्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी दीर्घ काळाकरिता टिकून राहते असे म्हटले जाते.

Leave a Comment