नवे सिम कार्ड घेण्यासाठी आता आधार सक्ती नाही


नवी दिल्ली – यापूर्वी मोबाइलचे नवे सिम कार्ड घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड द्यावे लागत होते. पण हा नियम केंद्र सरकारने शिथील केला असून आता आधार कार्डची मोबाइलचे सिम कार्ड घेण्यासाठी आवश्यकता नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. ग्राहकांकडून मोबाइल ऑपरेटर कंपन्या ओळख पत्र म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा मतदान ओळख पत्र यांचाही स्वीकार करू शकतात असेही केंद्राने स्पष्ट केले आहे.

याबाबत माहिती देताना टेलिकॉम सचिव अरूण सुंदराजन यांनी सांगितले आहे की या आदेशाची मोबाइल कंपन्यांनी त्वरित अंमलबजावणी करावी. ग्राहकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून या नव्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्यात आल्याचेही सुंदराजन यांनी स्पष्ट केले.

या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार सुंदराजन यांनी सांगितले आहे की सगळ्या टेलिकॉम कंपन्यांना आदेश देण्यात आले आहेत की ज्या व्यक्तीकडे आधार कार्ड नाही त्या व्यक्तीलाही सिम कार्ड दिले जावे. फक्त आधार कार्ड नाही हे कारण देऊन ग्राहकाला सिम कार्ड देण्यास मनाई करू नये. केवायसी अर्थात नो युअर कस्टमर चा अर्ज भरून घेताना त्यासोबत ओळखपत्र म्हणून इतरही पर्याय स्वीकारण्यास हरकत नाही असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Leave a Comment