प्रेक्षणीय प्रवासासाठी आता रेल्वेच्या मोठ्या खिडक्यांच्या गाड्या!


प्रेक्षणीय भागांतून प्रवास करणाऱ्यांना निसर्गाचा आस्वाद घेता यावा, यासाठी आता रेल्वे मोठ्या खिडक्यांच्या गाड्या चालवणार आहे. दक्षिण रेल्वेने या संदर्भात पुढाकार घेतला आहे.

उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये गर्दी खेचण्यासाठी दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही योजना मांडली आहे. सेंगोट्टै-पुनलूर मार्ग किंवा मदुरै ते रामेश्वरम या मार्गावर प्रवाशांना ‘ईकोटुरिझम’ आणि ‘मंदिर पर्यटना’चा अनुभव देण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनसोबत (आयआरसीटीसी) चर्चा चालू आहे. खासकरून परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याचा त्यामागे उद्देश आहे, असे टाईम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे.

दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना या मार्गावर व्हिस्टाडोम रेल्वे हवी आहे. व्हिस्टाडोम कोचमध्ये आसनाशेजारी भव्य खिडक्या आणि वर पारदर्शक छप्पर असते. मात्र ही गाडी उपलब्ध नसल्याने या टूर पॅकेजसाठी वातानुकूलित चेअर कार कोच चालविण्याची योजना अधिकाऱ्यांनी आखली आहे. शताब्दी एक्सप्रेस गाडीत वापरण्यात येणारे वातानुकूलित डबे यासाठी वापरण्यात येतील.

चित्तथरारक अशा पम्बन पुलावरून मदुराई ते रामेश्वरम या प्रवासासाठी या प्रस्तावाला मान्यता मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मदुरैतील स्थानिक ऑपरेटरकडून आकारण्यात येणाऱ्या टॅक्सी पॅकेजपेक्षा या प्रवासाचे तिकिट अर्धे असेल, त्यामुळे मदुरै विभाग यासाठी आग्रही आहे, असेदक्षिण रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment