प्राप्तिकर खात्याच्या कमाईत 1.5 लाख कोटींची भर, तरीही 65 लाख व्यक्तींवर नजर


कर भरण्यासाठी सरकारच्या प्रयत्नामुळे प्राप्तिकर खात्याच्या उत्पन्नात 2017-18 या वर्षात प्रत्यक्ष करांमध्ये 1.5 लाख कोटी रुपयांची वाढ झाली असून करदात्यांची संख्या 9.3 कोटींवर पोचली आहे. मात्र गेल्या वर्षी रिटर्न न भरलेल्या आणखी 65 लाख लोकांवर खात्याची नजर आहे.

या करदात्यांमध्ये टीडीएस भरणारे, आगाऊ कर भरणारे तसेच स्वमूल्यांकन कर इ. भरणाऱ्या व्यक्तींसोबतच रिटर्न भरणाऱ्यांचाही समावेश आहे. सरकारने 2016-17 मध्ये प्रत्यक्ष करापोटी 8.5 लाख कोटी रुपयांचा महसूल गोळा केला होता. त्या तुलनेत 2017-18 मध्ये 10 लाख कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला. वर्ष 2017-18 मध्ये 1.07 व्यक्तींनी पहिल्यांदाच रिटर्न दाखल केले. त्यामुळे ही बहुतांशी वाढ झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला सांगितले.

मात्र अनेक लोकांनी स्मरणपत्रे देऊनही चालू आर्थिक वर्षासाठी रिटर्न दाखल केलेले नाहीत. त्यांच्यावर खात्यातर्फे पाळत ठेवण्यात येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

खात्याच्या वतीने 1.75 कोटी “संभाव्य करदात्यांना” लक्ष्य करून टेक्स्ट मेसेजेस आणि ईमेल्स पाठवण्यात आले होते, त्यातील 1.07 कोटींनी स्वेच्छेने रिटर्न दाखल केले आहेत.

Leave a Comment