महिलांच्या सुरक्षेसाठी आहेत ही खास सेफ्टी अॅप्स


आजच्या प्रगत काळामध्ये आपण स्त्री पुरुष समानतेच्या बाजूने असलो, तरीही आजही महिला सुरक्षित नाहीत हे आपण मान्य करतो. आजकाल नोकरीमध्ये किंवा व्यवसायातील कामाच्या कक्षा इतक्या वाढलेल्या आहेत, की त्यासाठी कामाच्या वेळा घड्याळानुसार चालत्या ठेवणे काहीसे कठीण झालेले आहे. कामाच्या निमित्ताने सतत प्रवास करावा लागणे हा ही काहींच्या बाबतीत जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. आजच्या काळातील महिला देखील ह्या कोणत्याच बाबतीत पुरुषांच्या तुलनेमध्ये मागे नाहीत. घराची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून आजच्या काळातील महिला व्यावासायिक क्षेत्रामध्येही यशस्वी आहे. पण तरीही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न नक्कीच गंभीर वळण घेत आहे. लहान शाळकरी मुली, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या नवयुवती, गृहिणी, किंवा नोकरदार महिला, कुठेही असो, ती सुरक्षित असणे महत्वाचे आहे. त्या दृष्टीने खास महिलांच्या सुरक्षेसाठी काही खास अॅप्स डिझाईन करण्यात आली आहेत. ह्या अॅप्स चा वापर करून महिलांना त्यांना आवश्यक वाटेल तेव्हा मदत मागता येऊ शकते. त्यामुळे सर्व वयोगटातील महिलांनी आणि वरिष्ठ नागरिकांनी देखील ही अॅप्स आपल्या फोनवर अवश्य ठेवावीत.

महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने डिझाईन केलेले ‘माय सेफ्टीपिन’ हे अॅप सध्या महिलांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. ह्या अॅपमध्ये जीपीएस ट्रॅकिंग, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर्स सुरक्षित लोकेशन्स ची माहिती इत्यादी सर्व माहिती देणारी फीचर्स उपलब्ध आहेत. हे अॅप अडचणींच्या वेळी सुरक्षित बाहेर पडता येईल अशी सेफ्टी लोकेशन्स पिन करते, जिथे तुम्ही त्वरित पोहोचू शकता. तसेच तुम्हाला एखादा परिसर जर असुरक्षित वाटत असेल, तर तशी माहिती देखील इतरांना उपयोगी पडण्याच्या दृष्टीने ‘पिन’ केली जाऊ शकते. हे अॅप गुगल मॅप्स च्या मादीने गाईड करण्याचे कामही करते. हे अॅप इंग्रजी सोबत हिंदी भाषेमध्येही उपलब्ध आहे.

‘स्मार्ट 24x/7’ हे अॅप महिला आणि वरिष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने डिझाईन केलेले आहे. हे अॅप अनेक राज्यांच्या पोलीस कंट्रोल रूम्सशी लिंक्ड असून, वापरण्यास सोपे असे एक ‘पॅनिक बटन’ ह्या अॅप मध्ये दिलेले आहे. हे बटन प्रेस करता बरोबर संबंधित महिलेच्या किंवा वरिष्ठ नागरिकाच्या सर्व इमर्जन्सी नंबर तसेच पोलिसांकडेही अलर्ट मेसेज पाठविले जातात. तसेच ज्या अडचणीच्या परिस्थिती मध्ये महिला सापडली असेल, त्याचे ऑडियो आणि व्हिडियो रेकॉर्डिंगदेखील ह्या अॅप द्वारे केले जाऊन ते पोलीसांसमवेत त्वरित शेअर केले जाते. मदती साठी संदेश जीपीईसद्वारे पाठविला जात असला, तरी अनेकदा जीपीएस काम करीत नसल्याची शक्यता असते. अश्या वेळी ह्या अॅप द्वारे मदतीचे संदेश एसएमएस द्वारे पाठविले जातात. ह्या अपच्या मदतीने रुग्णवाहिका, किवा अग्निशमन दल यांसारख्या आपात्कालीन सेवांना देखील संदेश पाठविता येऊ शकतात.

‘बी सेफ’ ह्या अॅपमध्ये ही इमर्जन्सी बटन दिले गेले असून, ह्या द्वारे आपल्या इमर्जन्सी कॉन्टॅक्टस् ना व पोलिसांना मदतीसाठी संदेश पाठविता येऊ शकतो. हे अॅप देखील ऑडियो व्हिडियो रेकॉर्डिंग करू शकते. ह्या अॅपमध्ये असलेले ‘फॉलो मी’ नामक फीचर ऑन केल्यावर संबंधित महिलेचे परिवारजन किंवा मित्रमंडळी तिचे लोकेशन जीपीएसच्या मदतीने ट्रॅक करू शकतात. जर महिलेला एखाद्या व्यक्तीच्या तिथे असण्याने असुरक्षिततेची भावना होत असेल, तर ह्या अॅप मध्ये ‘फेक कॉल’ चा पर्याय उपलब्ध असून, हे बटन दाबल्यावर महिलेच्या फोनवर अॅप द्वारे फोन केला जातो. ह्या फोनमुळे संबंधित महिला कोणाच्यातरी संपर्कात आहे असे समोरच्याला वाटून पुढील धोका टळू शकतो. ह्या अॅपमध्ये असलेले अलार्म टायमर ह्या अॅपचे वैशिष्ट्य आहे. घरातून बाहेर पडलेली महिला अपेक्षित वेळी नियोजित ठिकाणी न पोहोचल्यास ह्या अॅपद्वारे तिच्या परिवारजनांना आणि पोलिसांना मदतीसाठी संदेश पाठविले जातात.

Leave a Comment