सुट्टीमध्ये महाराष्ट्रातील या ठिकाणांना अवश्य भेट द्या


मुलांच्या शाळा-कॉलेजना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. तसेच शनिवार रविवार ला जोडून काही सुट्ट्या आल्याने बहुतेक घरांमध्ये कुठे तरी बाहेर फिरायला जायचे बेत बनत आहेत. घरातल्या मंडळींसोबत किंवा मित्रमंडळींसोबत फिरायला जाताना अनेक लोकप्रिय पर्यटनस्थळांचा विचार होत असतो. जर जास्त दिवस सुट्टी मिळत असेल तर परदेशामध्ये भ्रमंतीचे ही बेत रंगत असतात. पण जर सुट्टी थोडक्या दिवसांची मिळत असेल, किंवा जर फार लांबवर प्रवास करण्याची इच्छा नसेल, तर महाराष्ट्रातील ह्या लोकप्रिय, निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या ह्या पर्यटन स्थळांचा विचार अवश्य करावा.

तारकर्ली हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. निळाशार समुद्र आणि पांढऱ्या शुभ्र रेतीचा समुद्रकिनारा तुम्हाला मोहून टाकल्याशिवाय राहणार नाही. येथे आल्यावर कामामुळे आलेला सर्व थकवा कुठल्या कुठे निघून जाईल. जर ह्या सुट्टीवर आणखी काही तरी थरारक करायचे असेल, तर स्कूबा डायव्हिंग किंवा पॅरा सेलिंग ह्यांचा आनंदही तुम्ही घेऊ शकता. अस्सल मालवणी पदार्थांचा मनमुराद आस्वाद तुम्ही येथे घेऊ शकता.

सह्याद्रीच्या खोऱ्यांमध्ये वसलेले सुंदर स्थळ म्हणजे भीमाशंकर. अकरा ज्योतीर्लिंगांपैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे. उंचावर असलेले हे महादेवांचे देवस्थान पाषाणांचे बनलेले आहे. हे देवस्थान अतिशय सुंदर असून, ह्या ठिकाण हून जिथवर दृष्टी जाईल तिथवर हिरवागार निसर्ग आणि डोंगरांचे दर्शन होते. इतर मंदिरांच्या मानाने ह्या देवस्थानामध्ये भाविकांची वर्दळ काहीशी कमी असते. भीमाशंकर जवळ असलेल्या सोलनपाडा धरणाजवळ ही तुम्ही फेरफटका मारून येऊ शकता.

बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तलाव निसर्गाची एक अभूतपूर्व देणगी आहे. अतिशय रहस्यमयी भासणाऱ्या ह्या तलावाचे पाणी अल्कालाईन आहे आणि सलाईन ( खारे )ही. वैज्ञानिकांच्या मते हा तलाव हजारो वर्षांपूर्वी झालेल्या उल्कापातामुळे बनला आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना अनेक दुर्मिळ पक्षी पाहण्याचा आनंद घेता येतो, त्यामुळे पक्षी प्रेमींसाठी हे अतिशय महत्वाचे पर्यटनस्थळ आहे. ह्या तलावापर्यंत पोहोचण्याचा रस्ता काहीसा दुर्गम असला, तरी हा प्रवास चित्तथरारक आहे. ह्या ठिकाणच्या आसपास अनेक प्राचीन मंदिरे आहेत, ज्यामध्ये अतिशय सुबक कोरीवकाम केलेल्या मूर्ती आहेत.

जर तुम्ही प्राणीप्रेमी, निसर्गप्रेमी असाल, तर ताडोबा अभयारण्याला जरूर भेट द्या. हे अभयारण्य चंद्रपूरच्या जवळ आहे. येथे त्तुम्हाला बाकी वन्य जीवांच्या सोबतच वाघ ही नजरेला पडण्याची उत्तम संधी आहे. येथे वाघ पाहण्यासाठी खास टायगर सफारीचे आयोजनही केले जाते. तसेच हरिणे, इतर वन्य प्राणी आणि दुर्मिळ प्रजातींचे पक्षी देखील इथे पाहायला मिळतील. लहान मुलांना खास आवडेल अशी ही सफर आहे.

आसपास निळे डोंगर, गर्द वनराई, थंडगार हवा ह्याचा आनंद घायचा असेल, तर महाबळेश्वरला जाण्याचा बेत करा. येथील डोंगरांवरून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याची मजा काही औरच. येथील तलावामध्ये तुम्ही बोटिंग करण्याचा आनंद घेऊ शकता किंवा येथील अवघड डोंगराळ वाटांवरून ट्रेकिंगचा थरार अनुभवू शकता. अगदी दोनचार दिवसांसाठीच सुट्टीवर जायचे असेल, तर महाबळेश्वर हा उत्तम पर्याय आहे.

Leave a Comment