भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना गुगलची आदरांजली


नवी दिल्ली – गुगलने भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना १४८ व्या जयंतीच्या निमित्ताने अनोखी आदरांजली वाहिली आहे. डुडलच्या माध्यमातून दादासाहेब फाळके यांच्या कार्याचा जगप्रसिद्ध सर्च इंजिन गुगलने गौरव केला आहे.

चित्रपटाच्या रिळाची पाहणी करणारे तरुणपणातील दादासाहेब डुडलमध्ये दाखविण्यात आले आहेत. त्यासोबतच दिग्दर्शन, निर्मिती आणि कलाकारांना चित्रीकरणादरम्यान सूचना देणारे दादासाहेबांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. अलीशा नंद्रा यांनी आजचे डुडल साकारले आहे.

३० एप्रिल १८७० मध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर याठिकाणी धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध संस्कृतज्ञ होते. भारतीय चित्रपटनिर्मिती क्षेत्राचा पाया दादासाहेबांनी घातला. यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते. १९१३ साली त्यांनी निर्मिलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपट व २६ लघुपटांची निर्मिती केली. त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो.

Leave a Comment