घरचे ताजे लोणी खा आणि उत्तम आरोग्य मिळवा


घरी आई किंवा आजी ताक करीत असल्या की त्या ताकावर फेसाळणाऱ्या लोण्यातला एक लहानसा गोळा आवर्जून घरातील मुलांच्या हातावर मिळत असे, ही आपल्यापैकी बहुतेक सर्वांचीच बालपणीची आठवण असेल. तसेच ताज्या गरम थालीपिठावर चमचाभर लोणी आवर्जून घातले जात असे. पण आजकालच्या लो फॅट आहाराच्या युगामध्ये लोणी खाण्याची सवयही लुप्त झाली आहे. आजकाल वैद्यक शास्त्रामध्येही लोणी खाण्याचे फायदे आणि तोट्यांबद्दल उलट सुलट चर्चा होत असतात. त्यामुळे लोणी खावे किंवा न खावे हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये घरचे ताजे पांढरे शुभ्र लोणी अगदी प्राचीन काळापासून आहे. पण अलीकडच्या काळामध्ये घरच्या लोण्याची जागा आकर्षक दिसणाऱ्या ट्रान्स फॅट फ्री किंवा लो फॅट बटरने घेतली आहे. उत्तम आरोग्य आणि वजन घटविण्याचे वायदे, हे बटर वापरणाऱ्या ग्राहाकाला केले जात असतात. पण आता ऋजुता दिवेकर ह्यांच्यासारखे सेलिब्रिटी न्यूट्रीशनिस्ट देखील आपल्या आहारामध्ये घरचे ताजे लोणी समाविष्ट करण्याचा सल्ला देत आहेत. बाजारामध्ये मिळणाऱ्या बटर मध्ये आणि घरच्या लोण्यामध्ये मूलभूत फरक ह्यातील पौष्टीकतेचा आहे. बाजारामध्ये मिळणाऱ्या पिवळ्या बटरमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. तसेच ह्यामध्ये ट्रान्स फॅटस् , शुगर्स आणि कलरिंग एजंट्सचा ही समावेश असतो.

त्या उलट घरच्या ताज्या लोण्यामध्ये शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक अनेक तत्वे आहेत. तसेच यामध्ये अ आणि ड जीवनसत्वे ही आहेत. कॅलरीज बद्दल बोलायचे झाले, तर बाजारामध्ये मिळणारे बटरचे निरनिराळे ब्रँड, कॅलरीरहित लोण्याचा वायदा करीत असतात. पण ह्यामध्ये सिंथेटिक फॅट असतात, ज्यांच्या नियमित सेवनाने वजन वाढू लागते. पण घरच्या ताज्या लोण्यामध्ये मात्र चांगले फॅटस् असून, हे वजन घटविण्यास आणि शरीर निरोगी ठेवण्यास सहायक आहेत.

सायीच्या विरजणातून काढलेल्या लोण्यामध्ये लेसिथीन नामक तत्व आहे. हे तत्व शरीरातील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक असते. तसेच लोण्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटस् असून हे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास सहायक आहेत. ह्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, अ आणि ड जीवनसत्व ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे ज्यांना वारंवार लहान सहान आजार उद्भवत असतील, त्यांनी आपल्या आहारामध्ये घरच्या लोण्याचा नियमित समावेश करावा. लोण्याच्या सेवनामुळे शरीराची चयापचय शक्ती वाढते. त्यामुळे वजन घटण्यास मदत होते.

लोण्याच्या सेवनामुळे त्वचेशी निगडीत अनेक समस्यांचे समाधान होते. जर त्वचा कोरडी पडत असेल, त्वचेवर वारंवार खाज सुटून पुरळ येत असेल, तर आपल्या आहारामध्ये लोण्याचा नियमित समावेश करा. लोण्यामध्ये इ जीवनसत्व असल्याने हे त्वचेला पोषण देणारे आहे. तसेच लोण्याच्या नियमित सेवनाने सांध्यांना वंगण मिळते आणि सांधेदुखी बरी होण्यास मदत मिळते. त्यामुळे ज्यांना संधिवात आहे, त्यांनी दररोज एक चमचा ह्याप्रमाणे, घरच्या लोण्याचे सेवन करावे. लोण्यामध्ये असलेले अराकिडॉनिक अॅसिड मेंदू सजग आणि सक्रीय राहण्यास मदत करणारे आहे. प्राचीन काळामध्ये लोणी आहारामध्ये समाविष्ट केले जात असल्याने, त्या काळातील लोक ‘मेंटल मॅथ्स’ किंवा बुद्धी सामर्थ्यावर गणिते किंवा तोंडी हिशोब करण्यात पटाईत असत असे आहारशास्त्राचे मत आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment