मुलांना बर्थडे पार्टी साठीचे शिष्टाचार शिकविणे आवश्यक


आजकाल मुलांचे वाढदिवस साजरे करणे हा घरोघरी आवर्जून साजरा होणारा प्रसंग आहे. पण ह्या बर्थडे पार्टीज आयोजित करताना किंवा मुलांना कोणाच्या बर्थडे पार्टी साठी पाठविताना काही गोष्टी मुलांना आत्मसात करण्यास शिकविणे इष्ट आहे. जर मुले कळती असतील, तर त्यांच्यासाठी आयोजित होणाऱ्या बर्थ डे पार्टी साठी त्यांनी कोणाला आमंत्रण द्यायचे ह्याचा निर्णय मुलांना घेऊ द्यावा. त्याचप्रमाणे ह्या पार्टी साठी लागणारी तयारी करण्यामध्ये देखील मुलांचा सक्रीय सहभाग असायला हवा. तसेच इतरांकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी जाताना कसे बोलावे, कसे वागावे, ह्याची शिकवण मुलांना देणे आवश्यक आहे.

जेव्हा आपण आपल्या घरी मुलांची बर्थडे पार्टी आयोजित करत असाल, आणि मूल लहान असेल, तर आलेल्या पाहुण्यांकडे पाहणे, सर्व लहान मुलांना सांभाळून सर्व कार्यक्रम पार पडणे ह्याची जबाबदारी सर्वस्वी मुलांच्या आई वडिलांची असते. पण जर मुले कळत्या वयातील असतील, तर ‘बर्थडे बॉय’ किंवा ‘बर्थडे गर्ल’ ने काही शिष्टाचार पाळणे आवश्यक आहे, आणि ते पाळण्याबद्दल पालकांनी आग्रही असावे. मुलांनी पार्टीसाठी बोलाविलेल्या पाहुण्यांचे स्वागत स्वतः करावे. तसेच पार्टीसाठी सर्व जण वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानावयास विसरू नये. पाहुण्यांनी आणलेल्या भेटींचा विनम्रतेने स्वीकार करून त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत. जर ही भेटवस्तू मुलांकडे आधीच असली, किंवा ती पसंत नसली, तरी त्याची जाणीव पाहुण्यांना होऊ देऊ नये.

मुलांनी, पार्टीमध्ये आलेल्या पाहुण्यांनी काय पोशाख परिधान केला आहे, किंवा त्यांच्या उठण्या-बसण्याच्या पद्धतीबद्दल, खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल कोणतीही चर्चा मित्र मैत्रिणींमध्ये करू नये. तसेच त्यांनी आणलेल्या भेटवस्तू ची चर्चा करणे ही टाळावे. जेव्हा पाहुणे मंडळी जाण्यास निघतील तेव्हा त्यांना स्वतः दारापर्यंत जाऊन प्रेमाने निरोप देणे अगत्याचे आहे. तसेच पार्टीसाठी आल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानावेत. पार्टी साठी आलेल्या पाहुण्यांना किंवा मित्र मैत्रिणींना पुढील दिवशी ‘थँक्यू कार्ड’ किंवा मेसेज पाठविणे ही देखील चांगली सवय आहे.

जेव्हा मुले बर्थडे पार्टी करिता कोणाकडे जात असतील, तेव्हाही त्यांनी पाळावयाच्या काही शिष्टाचारांबद्दल त्यांना समजावून सांगावे. पार्टी साठी पोहोचल्याबरोबर ज्याचा वाढदिवस असेल, त्याला पहिल्या प्रथम शुभेच्छा द्याव्यात. तसेच पार्टीमध्ये येण्यासाठी आमंत्रण दिल्याबद्दल आभार मानावेत. पार्टी साठी जाताना भेटवस्तू अवश्य बरोबर न्यावी. तसेच एखादे शुभेच्छा देणारे कार्डही बरोबर असावे. कधी कधी मुले पार्टीमध्ये कंटाळून जातात, पण तरी तसा उल्लेख न करता पार्टी एन्जॉय करायचा प्रयत्न करावा. जर वेळेआधी निघणे आवश्यक असेल, तर तशी कल्पना आपल्या यजमानांना देणे आवश्यक आहे.

पार्टीमध्ये आल्यावर केक कधी कापला जाणार, जेवण कधी लावले जाणार असे प्रश्न विचारणे मुलांनी टाळायला हवे. तसेच पार्टी मध्ये कोणी कुठल्याही प्रकारची मदत मागितली तर ती करण्यासाठी मुलांनी तयार असावे. ज्यांच्या घरी पार्टीसाठी मुले जातील, त्यांच्या घरातील कोणत्याही नाजूक, किंमती वस्तूंना हात न लावण्याबद्दल मुलांना समजावावे. जर कुठल्याही वस्तूचा वापर करायचा असेल, तर यजमानांची परवानगी घेणे आवश्यक असल्याबद्दल मुलांना सांगावे. पार्टी संपवून घरी परतताना यजमानांना धन्यवाद देणे विसरू नये.

Leave a Comment