आता रेल्वेत घ्या ८९ रुपयांच्या चिकन बिर्याणीचा आस्वाद!


नवी दिल्ली – इंडियन रेल्वे केटिरग अ‍ॅण्ड टुरिझम कार्पोरेशनने (आयआरसीटीसी) खानपान व्यवस्थेतील सर्व ठेकेदारांना रेल्वे गाडय़ांमध्ये देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थावर १८ ऐवजी पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लावण्याचे आदेश काढले असतानाच खाद्यपदार्थाचे दरपत्रकही त्याबरोबरीने जाहीर केले आहे. गाडीमध्ये प्रवाशाला सर्वात कमी किमतीत म्हणजे अवघ्या पाच रुपयांत चहा, तर ८९ रुपयांत बासमती तांदूळ वापरलेली चिकन बिर्याणी रेल्वे मिळू शकणार आहे. खाद्यपदार्थाचे वजन आणि प्रमाणही निश्चित करण्यात आले आहे.

प्रवाशांना रेल्वे गाडय़ांमधील पेन्ट्री कार, डायनिंग कारच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थावर १८ टक्के जीएसटीची आकारणी केली जात होती. अर्थ मंत्रालयाकडे हे प्रकरण गेल्यानंतर केवळ पाच टक्के जीएसटी आकारणी करण्याबाबत स्पष्टता करण्यात आली. पण त्यानंतरही काही ठेकेदारांकडून १८ टक्क्य़ांनुसारच प्रवाशांकडून वसुली केली जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या. त्यामुळे आयआरसीटीसीने नुकतेच याबाबत रेल्वेच्या खानपान व्यवस्थेतील ठेकेदारांसाठी आदेश काढले. खाद्यपदार्थावर त्यानुसार पाच टक्केच जीएसटी आकारण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याबरोबरीने पाच टक्के जीएसटीसह खाद्यपदार्थाची विक्री कोणत्या दराने करायची याबाबतही दरपत्रकाद्वारे सूचना करण्यात आली आहे. रेल्वेतील पेन्ट्री कार, डायनिंग कारमध्ये संबंधित दरपत्रक लावणे आणि खाद्यपदार्थाची पावती देणे सक्तीचे करण्यात आले आहे.

आयआरसीटीसीने जाहीर केलेल्या खाद्यपदार्थाच्या दरपत्रकामध्ये ८९ रुपयांच्या चिकन बिर्याणीचा समावेश आहे. दोनशे ग्रॅम बासमती तांदूळ, शंभर ग्रॅम चिकन आणि शंभर ग्रॅम रायता, असे या बिर्याणीचे प्रमाण ठरविण्यात आले आहे. याच प्रमाणात ५२ रुपयांत बासमतीची व्हेज बिर्याणीही मिळणार आहे. ७२ रुपयांत फिश करी, ६१ रुपयांत एग्ज बिर्याणी दरपत्रकात दर्शविण्यात आली आहे. इडली-चटणी १५ रुपये, पाव-भाजी ३६ रुपये, मसाला डोसा १८ रुपये, आमलेट २९ रुपये आदी पदार्थाचीही दरपत्रकात रेलचेल आहे.

Leave a Comment