नीलम धारण करणे तुमच्यासाठी शुभ आहे किंवा नाही हे कसे जाणून घ्याल?


ज्योतिष शास्त्रामध्ये, प्रतिकूल ग्रहमानाचे परिणाम एखाद्या व्यक्तीवर होऊ नयेत, ह्यासाठी निरनिराळी रत्ने धारण करण्याचा सल्ला दिला जातो. ह्या मौल्यवान रत्नांपैकी एक रत्न म्हणजे नीलम. हे शनीचे रत्न आहे. नीलम हे असे रत्न आहे, जे धारण केल्यानंतर त्याचे शुभ किंवा अशुभ परिणाम त्वरित दिसून येऊ लागतात. हे रत्न शनी ग्रहाचे असून हे धारण करणाऱ्याला ह्यातून खूप फायदा तरी होतो, किंवा खूप नुकसानही होते. जर एखाद्या व्यक्तीने नीलम धारण केला, तर तो शुभ फल देणारा ठरतो आहे, की अशुभ फल देणारा ठरतो आहे, ह्याची काही निश्चित लक्षणे ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितली गेली आहेत.

जर एखाद्या व्यक्तीने नीलम धारण केला आणि तो शुभ परिणाम देणारा असला, तर त्या व्यक्तीची अनेक वर्षांपासून रखडलेली कामे पूर्णत्वाला येऊ लागतात. कोणतेही अर्धवट राहिलेले काम, किंवा एखादी अडचण आल्याने बंद पडलेले काम अचानक सुरु होऊन पूर्णही होते. जर असे झाले, तर नीलम धारण करणे शुभ फल देणारे ठरते आहे असे समजावे. जर नीलम धारण केल्यानंतर अचानक धन लाभ होऊ लागला, किंवा अचानक नोकरी किंवा व्यवसायाशी निगडीत अनेक उत्तम पर्याय उपलब्ध होऊ लागले, तरी नीलम धारण करणे शुभ आहे असे समजावे. धारण केलेला नीलम जर शुभ फल देणारा असेल, तर त्या व्यक्तीला नीलम धारण केल्यानंतर सकारत्मक उर्जा जाणवू लागेल. तसेच ह्या रत्नाच्या प्रभावामुळे दुर्घटना देखील टळतात असे ज्योतिष शास्त्र सांगते.

ह्या उलट नीलम धारण केल्यानंतर त्या व्यक्तीला रात्री शांत झोप लागेनाशी झाली, किंवा भीतीदायक स्वप्ने पडून मन अस्वस्थ होऊ लागले, तर नीलम धारण करणे अशुभ असण्याची शक्यता असते. तसेच नोकरीमध्ये विनाकारण मनस्ताप होऊ लागला, किंवा व्यवसायामध्ये अचानक मोठे आर्थिक नुकसान होऊ लागले, तर नीलम धारण करणे अशुभ फल देत असल्याचे हे संकेत असू शकतात. क्वचित प्रसंगी नीलम धारण करणाऱ्या व्यक्तीला अचानक डोळे दुखणे, दृष्टीदोष, किंवा पायांमध्ये वेदना होणे अश्या समस्यांना देखील तोंड द्यावे लागू शकते. अश्या वेळी धारण केलेला नीलम शुभ फल देणारा नाही ह्याचा हा संकेत असू शकतो.

नीलम धारण करण्यापूर्वी तसा योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच नीलम खरेदी केल्यानंतर तो अंगावर धारण करण्याआधी नुसताच घरामध्ये आणून ठेवावा. नीलम रत्नाचे शुभ किंवा अशुभ फल त्वरित दिसून येत असल्याने तो अंगावर धारण न करता केवळ घरामध्ये ठेवल्याने देखील त्याचे शुभ किंवा अशुभ परिणाम दिसून येतील. जर परिणाम शुभ दिसून आले, तर हा नीलम अंगावर धारण करावा.

Leave a Comment