टायटॅनिकवरील मेंन्यू कार्डचा ९३ लाख रुपयांमध्ये लिलाव


टायटॅनिक ह्या महाकाय प्रवासी जहाजाला एका विशालकाय हिमनगाला धडकल्यामुळे जलसमाधी मिळाली हे सर्वश्रुत आहे. पण टायटॅनिक प्रवासाला निघण्यापूर्वी जेव्हा तिची चाचणी घेण्यात आली, तेव्हा २ एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिक समुद्रामध्ये प्रथम उतरविण्यात आली. त्यावेळी दुपारच्या भोजनासाठी बोटीवर कोणते पदार्थ सर्व्ह केले जाणार होते हे सांगणाऱ्या मेन्यू कार्डचा लिलाव नुकताच करण्यात आला. ह्या लिलावामध्ये हे मेन्यू कार्ड एक लाख पाऊंड, म्हणजेच सुमारे ९३ लाख रुपयांना विकले गेले.

हे मेन्यू कार्ड चालक दलातील एका सदस्याजवळ होते. ह्या व्यक्तीने हे मेन्यू कार्ड, टायटॅनिक तिच्या ‘मेडन व्हॉयेज’, म्हणजेच पहिल्या वहिल्या सफरीला निघण्यापूर्वी, आपल्या पत्नीकडे दिले होते. ह्या मेन्यू कार्डमध्ये दिलेले पदार्थ टायटॅनिकच्या प्रथम ‘ट्रायल’ च्या दिवशी दुपारच्या जेवणामध्ये बनविले गेले होते. ह्या मेन्यू वरील तारीख २ एप्रिल १९१२ असून, ह्यामध्ये उल्लेख केलेल्या पदार्थांमध्ये ‘फ्राईड चिकन’ आणि ‘ब्रेझ्ड हॅम’ या पदार्थांचा समावेश असलेला दिसून येत आहे.

ह्या निलामी पूर्वी, टायटॅनिक बोटीवर, ती बुडण्यापूर्वी सर्व्ह केल्या गेलेल्या अंतिम भोजनाची यादी असलेल्या मेन्यू कार्डचा, ३० सप्टेंबर २०१५ साली ‘लायन हार्ट्स ऑटोग्राफ्स’ नामक संस्थेच्या वतीने लिलाव करण्यात आला होता. हा लिलाव ऑनलाईन झाला असून त्याकाळी ह्या मेन्यू साठी ८८,००० डॉलर्स इतकी किंमत मिळाली होती. संस्थेला अपेक्षित असलेल्या ५०,००० ते ६०,००० डॉलर्स च्या किंमतीच्या मानाने हे किंमत पुष्कळ अधिक होती. प्रथम श्रेणीच्या प्रवाश्यांसाठी बनविलेल्या ह्या मेन्यूमध्ये ‘चिकन आला मेरिलंड’, ‘आईस्ड ड्रॉट म्युनिख लागर बियर’, ह्यांचा उल्लेख आहे. ह्या मेन्यूवरची तारीख १४ एप्रिल रोजीची आहे. ह्या मेन्यूकार्डवर आयसॅक जेराल्ड फ्राउन्थाल नामक प्रवाश्याची अद्याक्षरे आहेत.

असेच आणखी एक मेन्यूकार्ड २०१२ साली वीस हजार डॉलर्स किंमतीला विकले गेले होते. हे मेन्यूकार्ड अब्राहम सेल्मोन नामक प्रवाश्याकडे होते. अब्राहम ह्या अपघातातून वाचले होते. मनीबोट नामक टायटॅनिकवरील लाईफबोटमध्ये चढून अब्राहम ह्यांनी स्वतःचे प्राण वाचविण्यात यश मिळविले होते.

Leave a Comment