प्रवासामध्ये प्रियजनांसाठी भेटवस्तू खरेदी करताना…


प्रवासाच्या निमित्ताने आपण बाहेर गेलो, की आपल्या मित्र-मैत्रिणींसाठी किंवा नातेवाईक मंडळींसाठी भेटीदाखल लहान मोठ्या भेटवस्तूंची खरेदी आपण हटकून करतोच. विशेषतः परदेशी किंवा भारतातील इतर राज्यांमध्ये फिरायला गेल्यावर तिथली संस्कृती, परंपरा दर्शविणाऱ्या वस्तू घेण्याकडे आपला जास्त कल असतो. म्हणूनच अश्या भेटवस्तूखरेदी करताना सहायक ठरतील अश्या काही टिप्स.

भेटवस्तूंची खरेदी करण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी ज्या मार्केट मध्ये तुम्ही जाणार असाल, त्याबद्दल तेथील स्थानिक रहिवाश्यांकडून संपूर्ण माहिती जाणून घ्या. जर तुम्ही हॉटेलमध्ये रहात असाल, तर हॉटेलचा स्टाफ तुम्हाला याबद्दल नक्कीच मार्गदर्शन करू शकेल. कोणत्या दुकानामध्ये चांगल्या प्रतीच्या आणि योग्य भावामध्ये भेटवस्तू उपलब्ध होऊ शकतील, बार्गेन करणे कितपत शक्य आहे ह्याची माहिती करून घेतल्याने तुमचे काम सोपे होऊन दहा दुकाने हिंडण्याचे श्रम वाचतील आणि वेळेची बचत होईल. तसेच तुम्हाला नेमक्या कश्याप्रकारच्या वस्तू घ्यायच्या आहेत हे आधीच ठरवून ठेऊन त्याप्रमाणे माहिती विचारून घ्यावी. म्हणजे तुम्हाला तिथे मिळणारा कपडा खरेदी करायचा आहे, की दागिने घ्यायचे आहेत, शोभेच्या वस्तू किंवा तेथील स्थानिक खाद्यपदार्थ, मसाले इत्यादी खरेदी करायचे आहेत ह्याची योजना आधीच बनवून ठेवा. तसेच खरेदीला बाहेर पडताना शक्य असल्यास स्थानिक भाषेतील, खरेदीसाठी उपयोगी पडतील असे शब्द शिकून घ्या. त्यामुळे बार्गेन करताना भाषा नक्की उपयोगी पडेल.

तुम्हाला ज्या भेटवस्तू खरेदी करायच्या आहेत, त्यासाठी किती खर्च करायचा आहे ह्याचे बजेट आधीच नक्की करावे. ‘पुन्हा पुन्हा इथे येणे होणार नाही’ असा विचार करून दिसेल त्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरावा. तसेच ज्यांच्याकरिता भेटवस्तू खरेदी करायच्या आहेत त्यांच्या नावांची यादी बरोबर ठेवावी आणि नेमक्या तेवढ्याच वस्तू खरेदी कराव्यात. भेटवस्तू घेताना ती महाग असली पाहिजे असे नाही. भेट देण्यामागील भावना महत्वाची असते. भेटवस्तूंची निवड करताना, तुम्ही जिथे राहता तिथे ती न मिळणारी असावी. तुम्ही फिरायला जिथे गेला आहात, तेथील संस्कृती, परंपरा दर्शविणारी भेटवस्तू उत्तम ठरते.

भेटवस्तू विकत घेताना जिथे पर्यटकांची सर्वात जास्त गर्दी असते, त्याच दुकानांमध्ये जायला हवे असे नाही. सर्वसाधारणपणे खास पर्यटकांसाठी म्हणून जी दुकाने असतात, त्यांमधील वस्तू, वास्तविक किंमतीच्या मानाने जास्त भावामध्ये विकल्या जात असतात. म्हणून, भेटवस्तू खरेदी करताना, तेथील स्थानिक लोक कोणत्या दुकानांमधून खरेदी करतात ह्याची माहिती करून घेऊन त्या दुकानांनाही भेट द्यावी. त्या दुकानांमध्ये देखील एखादी वस्तू तितकीच उत्तम प्रतीची आणि शिवाय कमी किंमतीत उपलब्ध असण्याची शक्यता जास्त असते. वस्तू खरेदी करण्यापूर्वी शक्य असल्यास संपूर्ण बाजाराचा सर्व्हे करून घेऊन कोणत्या वस्तू कुठे जास्त चांगल्या मिळतात हे पाहून घ्यावे. त्यानंतरच वस्तूंची खरेदी करावी.

Leave a Comment