सोशल मीडिया आणि आरोग्य


एक काळ असा होता की, मोबाईल फोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग व्हायला लागला होता. एवढा की, त्याला आपण आपल्या शरीराचा एक अवयवच समजायला लागलो होतो. पण ती एक गरज होती आणि तिचे आपल्या आयुष्यावर फार गंभीर स्वरूपाचे परिणाम होत नव्हते. नंतर स्मार्ट फोन आला आणि आपल्या केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि बौद्धीक जीवनाचाही तो भाग बनला. भाग बनला म्हणजे आपल्या या जीवनावर या फोनचे गंभीर दुष्परिणाम व्हायला लागले. हा स्मार्ट फोन म्हणजे केवळ फोन राहिला नाही तर तो सोशल मीडिया झाला. त्याला माध्यमाचे स्वरूप आले आणि आपल्या जीवनात तो अनेक अर्थाने यायला लागला. आधी मोबाईल फोन बाळगणे ही सवय झाली होती पण स्मार्टफोनने फोन सतत वापरणे ही सवय झाली.

स्मार्ट फोनच्या वापरातून आपण जगातल्या कोणत्याही कोपर्‍यात राहणार्‍या कोणत्याही माणसाशी क्षणात जोडले जायला लागलो. ही क्रांतीच आहे पण या जोडण्याचा अतिरेक व्हायला लागला. ज्या व्यक्तीशी जोडले जाणे तसे अनिवार्य आणि या क्षणाला आवश्यक नाही त्याच्याशी आपण केवळ जोडले जाणे सोपे आहे म्हणून संवाद साधायला लागलो. हे अनावश्यक जोडले जाणे हे गरजेचे नसताना घडायला लागल्याने आपला वेळ वाया जायला लागला. ती एक सवयच होऊन बसली. तिचा अतिरेक झाला की, मग आपल्याला एक़ वेगळेच एकाकीपण यायला लागले. आपण बसल्या बसल्या दूरच्या माणसाशी जोडले जातोय आणि त्यात वेळ वाया घालवतोय पण आपल्या आसपासच्या आणि कुटुंबातल्या माणसांशी फटकून रहातोय असे व्हायला लागले आणि आसपासच्या लोकांत आपण वेगळे पडायला लागलो.

आपला असा लोकांशी जोडले जाण्याचा वेळ आपल्या हातात नसतो. आपण जसे लोकांना न सांगता त्यांना संदेश पाठवतो आणि त्यांच्यावर त्यांना नको असलेल्या संदेेशांचा मारा करतो तसे इतर लोक आपल्या वेळेचा विचार न करता आपल्याला संदेश आणि व्हिडियोज पाठवायला लागतात. आपणही लोकांच्या वेळेचा खेळखंडोबा करतो आणि त्यांच्या संदेशामुळे आपल्याला वेळेचा खेळखंडोबा होत रहातो. परिणामी आपल्या झोपेच्या वेळा बदलतात. स्मार्ट फोनवरचे संदेश पहात आपण किती वेळ घालवत असतो याचे आपल्याला भान रहात नाही. परिणामी आपल्या खेळाचे वेळापत्रक बिघडून जाते आणि काही लोकांना निद्रानाशाचा विकार जडतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment