महिलांनी हाय हील्स वापरताना घ्यावी ही काळजी


आजकाल महिलांच्या पोषाखांच्या जश्या निरनिराळ्या स्टाईल्स प्रचलित आहेत, त्याचप्रमाणे अनेक स्टाईल्सची पादत्राणे देखील लोकप्रिय ठरत आहेत. पण ह्यांमध्ये सर्वात जास्त पसंत केले जातात ते म्हणजे हाय हील्स, किंवा उंच टाचांच्या चपला अथवा सँडल्स. मग ड्रेस ‘वन पीस’ असो किंवा पारंपारिक सलवार कमीज, साडी असो, त्यासोबत हाय हील्स परिधान केल्याने संपूर्ण पोशाखाला एक आगळाच लुक येत असतो. पण हाय हील्स चा अतिवापर शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरू शकतो. त्यामुळे हाय हील्सचा वापर वारंवार केला जात असेल, तर काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

हाय हील्सचा सतत वापर केल्याने स्नायूंवर किती ताण येऊ शकतो, किंवा कंबर दुखी, पाठदुखी आणि तत्सम समस्या कशा उद्भवितात ह्यावर नेहमीच चर्चा होत असलेल्या पाहायला, वाचायला मिळतात. मात्र वैज्ञानिकांनी अलीकडच्या काळात प्रसिद्ध केलेल्या एका शोधामध्ये, जर हाय हील्सची उंची पाच इंचांपेक्षा जास्त असेल, तर ते नियमित वापरल्याने महिलांच्या पोश्चर मध्ये अनैसर्गिक स्वरूपाचे बदल घडून येत असल्याचे निदान केले आहे. क्वचितप्रसंगी ह्या अनैसर्गिक पोश्चरमुळे महिलांना गर्भधारणेमध्ये अडथळे येत असल्याचे ह्या शोधामध्ये म्हटले आहे.

हाय हील्स वापरल्याने बदलत असलेल्या पोश्चरचा नकारात्मक प्रभाव शरीरातील गर्भाशय, आणि इतर प्रजनेन्द्रीयांवर पडत असतो. विशेषतः नुकत्याच वयामध्ये आलेल्या मुलींमध्ये अनेक तऱ्हेचे शारीरिक आणि मानसिक बदल घडून येत असतात. तसेच त्यांच्या पायांची हाडे, पेल्व्हीस, आणि पाठीचा कणा संपूर्णपणे विकसित झालेला नसतो. म्हणूनच इतक्या लहान वयामध्ये हाय हील्स वापरल्याने पाठीच्या कण्याला बाक येऊ शकतो. त्यामुळे मुलींचे खांदे झुकल्यासारखे दिसू लागतात.

स्त्रीरोग विशेषज्ञांच्या मते ज्या महिला दररोज, सतत हाय हील्सचा वापर करतात, त्यांना गर्भधारणेमध्ये अडथळे येऊ शकतात. हाय हील्सच्या वापराने गर्भाशयाला आधार देणारे लिगामेंट कमकुवत होऊ लागते, त्यामुळे गर्भधाराणेमध्ये आणखीनच अडथळे येऊ शकतात. म्हणूनच दररोज सपाट, आणि आरामदायक पादत्राणांचा वापर करून हाय हील्स चा वापर मर्यादित प्रमाणात करावा.

Leave a Comment