वेबपेजेस ‘ब्लॉक’ करण्यात भारत जगात अव्वल !


नवी दिल्ली – भारतातच वेबपेजेसवरील मजकुराला चाळणी लावणाऱ्या रोधक यंत्रणांची संख्या सर्वाधिक असून सर्वाधिक वेबपेजेस भारतातच ‘ब्लॉक’ केली जातात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा निष्कर्ष दी इंडियन एक्स्प्रेस, कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (सीबीसी) आणि टोरांटो विद्यापीठाच्या ‘सिटीझन लॅब’ने दहा देशांच्या केलेल्या संयुक्त तपासणीत निघाला असून हा अहवाल आज प्रसिद्ध केला जाणार आहे.

या दहा देशांनी हे काम संकेतस्थळावरील माहितीला चाळण लावणाऱ्या आणि अनेकदा संकेतस्थळ किंवा त्यावरील पेज रोखणाऱ्या कॅनडातील ‘नेटस्वीपर’ या कंपनीवर सोपवले होते. त्यामुळे त्यांचीच पाहणी केली गेली. ही पाहणी ऑगस्ट २०१७ ते एप्रिल २०१८ या नऊ महिन्यांत झाली. ‘नेटअडवेगिरी’ करणाऱ्या ४२ रोधक यंत्रणा भारतात कार्यरत होत्या, तर हे प्रमाण पाकिस्तानात २० होते.

संकेतस्थळावर ‘सर्च’साठी जेव्हा यूआरएल टाइप केला जातो तेव्हा तोच अनेकदा रोखला जातो आणि तो शब्द पहिल्याच क्लिकमध्ये शोध खुंटतो किंवा एखाद्या वादग्रस्त मुद्दय़ातील ज्या गोष्टी उघड होऊ द्यायच्या नसतील, त्या मांडणारी संकेतस्थळे, किंवा संकेतस्थळांवरील काही मजकूर हा शोधपट्टय़ात झळकतही नाही. या दहा देशांत अशा प्रकारे नेटाने ही अडवेगिरी झाल्याचे २,४६४ प्रकार घडले आणि एकटय़ा भारतातच त्यातील १,१५८ प्रकार आहेत. ही आकडेवारी अवघ्या नऊ महिन्यांतली असल्याने प्रत्यक्षात ही कामगिरी अधिक मोठय़ा प्रमाणातही असेल, असे पाहणीकर्त्यांचे मत आहे.

Leave a Comment