प्रवासामध्ये उलट्यांचा (मोशन सिकनेस) त्रास होत असल्यास कर हे उपाय


गाडीने, ट्रेनमधून किंवा बसमधून प्रवास करीत असताना काही व्यक्तींना उलट्यांचा त्रास होतो. ह्यालाच आपण मोशन सिकनेस किंवा गाडी लागणे असे म्हणतो. प्रवासामध्ये हा त्रास होऊ नये ह्यासाठी काही उपायांचा अवलंब करता येईल. जर कार मधून प्रवास करताना मळमळ होत असेल, किंवा उलटीची भावना होत असेल, तर दीर्घ श्वाशोछ्वास करावा. त्याने मळमळ कमी होईल. तसेच कारमध्ये पुढच्या सीटवर बसावे, आणि शक्यतो कारच्या खिडकीकडे मान न वळविता समोर पाहत राहावे.

मोशन सिकनेस कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे पेपरमिंट. पेपरमिंट ऑइलचे काही थेंब रुमालावर घालून हा रुमाल वेळोवेळी हुंगत राहावा. ह्याने मळमळ किंवा उलटीची भावना कमी होण्यास मदत मिळेल. तसेच आपल्यासोबत पेपरमिंट फ्लेवरच्या टी बॅग्स आणि गरम पाणी ठेवावे. हा पेपरमिंट फ्लेवरचा चहा प्यायल्याने देखील उलटीची भावना कमी होते. तसेच आपल्यासोबत सुंठ, किंवा आल्याच्या फ्लेवरच्या गोळ्या ठेवाव्यात. ह्या गोळ्याही प्रवासादरम्यान चघळत राहावे. आल्याचा चहा देखील लाभकारी आहे.

ज्यांना प्रवासादरम्यान उलट्यांचा त्रास होतो त्यांनी लेखन, वाचन, कॉम्प्युटरवर काम करणे टाळावे. डोक्याच्या मागे हलका आधार किंवा उशी घेऊन डोके मागे झुकवून बसावे. शक्य असल्यास खिडकीतून ताजी हवा आत येऊ द्यावी. ताज्या हवेचा संचार राहिल्याने मळमळ कमी होईल. आजकाल प्रवासामध्ये उलट्या होऊ नयेत या साठी अनेक तऱ्हेची औषधे किंवा गोळ्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. क्वचित ह्या गोळ्या घेतल्याने गुंगी, ग्लानी येऊ शकते. त्यामुळे अश्या प्रकारची कोणतीही औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.

प्रवास करताना नेहमी उलट्यांचा त्रास होत असेल, तर प्रवासाला निघण्यापूर्वी हलका आहार घ्यावा. पोटभर जेऊ नये किंवा पचण्यास जड, तेलकट पदार्थांचे सेवन टाळावे. तसेच प्रवासादरम्यानही वारंवार खाणे टाळावे. मात्र द्रव आहार घेत राहावे, तसेच पाण्याचे सेवनही अधिक मात्रेमध्ये करावे. त्यामुळे डीहायड्रेशन होणार नाही.