सांधेदुखीसाठी अरोमा थेरपी लाभदायक


आजकालच्या काळामध्ये सांधेदुखी हा विकार केवळ वाढत्या वयाचे लक्षण राहिलेला नाही. वेगाने बदलणारी जीवनशैली, संतुलित आहार आणि व्यायामाचा आभाव ह्या सर्व गोष्टींमुळे सांधेदुखीचा त्रास लोकांना आता तरुण वयामध्ये ही जाणवू लागला आहे. ह्या सांधेदुखी वर उपाय म्हणून अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. ह्याच उपचार पद्धतींपैकी एक आहे अरोमा थेरपी. ह्या उपचार पद्धतीमध्ये अनेक प्रकारच्या ‘इसेन्शियल ऑइल्स’ चा वापर केला जातो. महत्वाची गोष्ट अशी, की ही थेरपी कोणत्याही स्पा मध्ये न जाता घरच्याघरी देखील घेता येऊ शकते.

शारीरिक वेदना, किंवा स्नायूंवर आलेला तणाव कमी करण्यास इसेन्शियल ऑइल्स अतिशय लाभाकारी ठरत आहेत. ह्या तेलाची खासियत ही, की ही तेले लवकर गरम होतात, आणि त्वचेमध्ये जास्त काळापर्यंत अवशोषित होऊन राहतात. शरीराच्या ज्या भागामध्ये वेदना असतील, त्या भागातील रक्ताभिसरण सुधारण्याचे काम ही इसेन्शियल ऑइल्स करीत असतात. तसेच सांध्यांवर सूज आली असल्यास ती कमी करण्यासाठी देखील इसेन्शियल ऑइल्स सहायक आहेत. म्हणूनच आजकाल सांधेदुखीसाठी अरोमा थेरपीचा पर्याय निवडण्याकडे लोकांचा जास्त कल दिसून येत आहे. यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलांमध्ये पेपरमिंट, कापूर, लॅव्हेंडर, जिंजर( आले )लेमनग्रास, रोजमेरी इत्यादी तेलांचा प्रामुख्याने वापर केला जातो.

ही तेले शरीरातील नसांवर प्रक्रिया करून मेंदूची संवेदनशीलता वाढविण्यास मदत करतात. विशेषतः सांधेदुखी करिता पेपरमिंट तेलाचा जास्त उपयोग केला जातो. ह्या तेलाचे सात आठ थेंब दोन चमचे खोबरेल तेलामध्ये मिसळून हे मिश्रण कोमट करून घ्यावे आणि दुखऱ्या सांध्यांवर हलक्या हाताने चोळावे. ह्या तेलाच्या मसाजने सांध्यांमधील वेदना कमी होते. ह्या मिश्रणामध्ये खोबरेल तेलाचा वापर करायचा नसेल तर अन्य कोणत्याही तेलाचा वापर करता येऊ शकेल.

त्याचप्रमाणे अरोमा थेरपीमध्ये वापरले जाणारे जिंजर ऑइल, किंवा आल्याचे तेल हे देखील इतर कोणत्याही तेलामध्ये मिसळून जिथे सांध्यामध्ये वेदना आहे, तिथे हलक्या हाताने चोळून लावावे. जिंजर ऑइल, लॅव्हेंडर ऑइल, आणि लेमनग्रास ऑइल ह्यांचे मिश्रण एकत्रितपणे दुखणाऱ्या सांध्यांवर लावल्याने सांधेदुखी कमी होते. केवळ लॅव्हेंडर तेलाचा वापर करायचा असल्यास, हे तेल इतर कोणत्याही तेलासोबत न मिसळता सरळ दुखणाऱ्या सांध्यावर लावावे. ह्या तेलाचा मसाज नेहमी गोलाकार हात फिरवूनच करावा. हे तेल अतिशय सुगंधी असून वेदनाशमन करण्याची शक्ती ह्या तेलामध्ये आहे.

लेमनग्रास तेलाचा उपयोग निरनिराळ्या पद्धतीने केला जाऊ शकतो. ह्या तेलाचा उपयोग सांधेदुखीसाठी करायचा झाल्यास एका भांड्यामध्ये पाणी उकळून त्यामध्ये ह्या तेलाचे काही थेंब टाकावेत. ह्या पाण्याची वाफ दुखऱ्या सांध्यावर घेतल्याने आराम पडतो. त्याचप्रमाणे रोजमेरी ऑइल इतर कोणत्याही तेलामध्ये न मिसळता सरळ शरीराच्या दुखऱ्या भागावर लावता येऊ शकते. ह्या तेलामध्ये असलेल्या रोजमेरीनिक अॅसिड मध्ये वेदना शमविणारे गुण आहेत. लवंगेचे तेल जोजोबा ऑइल मध्ये मिसळून लावल्यासही सांध्यांच्या वेदना कमी होतात.

सांधेदुखी साठी अनेक उपचारपद्धती जरी उपलब्ध असल्या, तरी मुळात सांधेदुखी उद्भवू नये ह्या करिता आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. शरीरामध्ये ड जीवनसत्वाची कमतरता असल्यानेही सांधेदुखी उद्भविते. ही कमतरता दूर करण्यासाठी दररोज काही काळ सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसावे. तसेच दररोज अॅलो व्हेरा रसाचे सेवन केल्याने सांध्यांना वंगण मिळून सांध्यांची हालचाल पूर्ववत होण्यास मदत मिळते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment