येथे जनकाला सापडली होती सीता


बिहार मधील सीतामढी जिल्ह्यात सीता जनकाला जमीन नांगरताना सापडली असे उल्लेख पुराणात आहेत. हे ठिकाण म्हणजे पुनौराधाम. येथे सीतामातेचे भव्य मंदिर उभारले गेले असून या ठिकाणाचा नालंदा विश्वविद्यालयाच्या धर्तीवर विकास करण्याची इच्छा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी व्यक्त केली आहे. चारधाम प्रमाणे देशात हे पाचवे धाम म्हणून ओळखले जावे असेही नितीशकुमार म्हणाले.

सीता नवमीचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. वैशाख शुद्ध नवमी हा तो दिवस. वैष्णव संप्रदाय या दिवशी व्रत पाळतात. त्यामुळे १६ महान दानांचे फळ मिळते असा समज आहे. तसेच सर्व तीर्थस्थळांच्या वारीचे पुण्य मिळते अशीही भाविकांची श्रद्धा आहे.


सीता जन्म कथा अशी की मिथीलेचा राजा जनक याला संतान नव्हते. तसेच त्याच्या राज्यात अनेक वर्षे पाउस नव्हता. यावर काय उपाय असे त्याने ऋषींना विचारले तेव्हा ऋषींनी त्याला स्वतः जमीन नांगर म्हणजे इंद्रकृपा होऊन पाउस पडेल असा उपाय सांगितला. जनकाने त्याप्रमाणे केले तेव्हा नांगराचा फाळ धातूला अडकला. तेथे खोदून पहिले तेव्हा पेटीत हि सुंदर बालिका जनकाला सापडली.

जनकाने ही बालिका देवाचा प्रसाद समजून घरी आणली आणि तिचे पालनपोषण केले. जनकाची कन्या म्हणून ती जानकी. मिथिलेची राजकन्या म्हणून ती मिथीला. पण तिचे सीता नाव ठेवले ते नांगराच्या फाळाला येथे सीत म्हणतात. त्यावरून ती सीता. मिथिला आता नेपाल मध्ये असले तरी तेथेही सीता नवमी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते.

Leave a Comment