मांसाहारी पदार्थ बनविल्यावर भांड्यांमध्ये येणारा गंध जावा यासाठी काही टिप्स


घरामध्ये मांसाहारी स्वयंपाक केला गेला, की ते पदार्थ ज्यामध्ये बनविले त्या भांड्यांची किंवा ओव्हनची सफाई करणे हे मोठे जिकीरीचे काम असते. पदार्थ चवदार बनत असला, तरी त्यामुळे भांडी किंवा ओव्हन मात्र चिकट, तेलकट होतात. तसेच ह्या भांड्यांमध्ये किंवा ओव्हनमध्ये एक विशिष्ट वास येऊ लागतो. विशेषतः मासे बनविले की भांड्यांना वास येऊ लागतो. भांड्यांना किंवा ओव्हनमध्ये येणारा हा विशिष्ट वास घालविण्यासाठी काही सोप्या उपायांचा अवलंब करता येईल.

लिंबाचा वास चांगला आणि स्ट्रॉन्ग येत असल्याने आणि लिंबू अॅसिडीक असल्याने भांड्यांचा चिकटपणा काढून टाकून त्यांमध्ये येणारा वास घालविण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. मांसाहारी पदार्थ ज्यावर कापतो तो चॉपिंग बोर्ड देखील मीठ आणि लिंबू लावून दुर्गंधी रहित आणि किटाणूरहित करता येतो. मांसाहारी पदार्थांचा वास भांड्यामधून किंवा ओव्हनमधून जाण्यासाठी लिंबाच्या सालीने भांडी घासावीत. त्यानंतर ही भांडी साधारण पंधरा मिनिटे तशीच ठेऊन त्यानंतर परत लिंबाचा रस लावून भांडी घासावीत. ओव्हन साफ करण्यासाठी लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा ह्या मिश्रणाचा वापर करावा. बेकिंग सोडामध्ये लिंबाचा रस मिसळून जाडसर पेस्ट तयार करून घ्यावी. हे पेस्ट ओव्हनमध्ये व्यवस्थित पसरून ठेवावी. काही वेळाने ओल्या कपड्याने ही पेस्ट पुसून काढावी.

मांसाहारी पदार्थांची दुर्गंधी घालविण्यासाठी व्हीनेगरचा वापरही करता येईल. भांड्यांवरील डाग हटविण्यासाठी व्हिनेगर उपयोगी आहेच, त्याशिवाय हे भांड्यांची चमक वाढविण्यासही उपयोगी आहे. भांडी धुताना आधी नेहमीप्रमाणे साबणाने धुवून घ्यावीत. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे व्हिनेगर घालून ठेवावे. दहा मिनिटांनंतर भांडी साध्या पाण्याने विसळून घ्यावीत. लिंबाच्या सालीप्रमाणे संत्र्याची साल देखील भांड्यांची दुर्गंधी घालविण्यास उपयोगी आहे. ह्याचा वापर लिंबाच्या सालीप्रमाणे करता येईल, किंवा मांसाहारी पदार्थ शिजविलेल्या भांड्यामध्ये थोडे पाणी घालून त्यामध्ये संत्र्याची साल घ्यावी आणि हे पाणी पंधरा मिनिटे उकळू द्यावे. त्यानंतर भांडे नेहमीप्रमाणे साबणाने धुवावे. तसेच हे भांडे धुण्याआधी त्यामध्ये सफरचंदाची फोड रगडल्यासही दुर्गंधी नाहीशी होते.

भांड्यांची दुर्गंधी घालाविण्याकरिता आणखी एक सोपा उपाय असा, की ही भांडी काही वेळ गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवावीत. त्यानंतर चांगल्या प्रतीच्या लिक्विड डीश सोपने भांडी धुवावीत. शक्यतो लिंबाच्या रसाचा अर्क असलेल्या लिक्विड सोपने भांडी धुवावीत.

Leave a Comment