सहा वनस्पती देतात आरोग्याची खात्री


आपल्या सभोवताली असलेल्या काही सामान्य वनस्पती आपण नित्य पहात असतो पण त्यांचे औषधी गुणधर्म अभ्यासायला लागलो की मात्र आपल्यावर आश्‍चर्यचकित होण्याची वेळ येतेे. आयुर्वेदाने तर अशा वनस्पतींची महती गायिली आहेच पण अलीकडच्या काळात त्यावर आधुनिक पद्धतीनेही संशोधन होत आहे. या अभ्यासातून आपल्या नित्य परिचयाच्या असलेल्या सहा वनस्पतींचे गुणधर्म समोर आले आहेत. आता आपल्या आयुष्यात जीवनपद्धतीशी निगडित असे अनेक विकार निर्माण होत आहेत. अशा विकारांवर आयुर्वेदाने वर्णिलेल्या पण आपल्या आसपास असलेल्या, एरवी सामान्य समजल्या जाणार्‍या वनस्पती किती गुणकारी असतात हे दिसायला लागले आहे.

आयुर्वेद तज्ञांनी अशा सहा वनस्पतींची महती सांगितली आहे. त्यांचा उपयोग औषधांसारख़ा तर होतोच पण प्रतिबंधात्मकही आहे. म्हणजे कोणतेही आजार होण्याची वाट न पाहता या वनस्पतींचा वापर आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे केला तर हे आजार आपल्या जवळपासही फिरकण्याची हिंमत करणार नाहीत. प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या दारात तुळशीचे वृदांवन असतेच. वृदांवन नसले तरी निदान कसल्या का होईना पण डब्यात तुळस लावलेली असतेच. तिची पूजा करण्याची परंपरा आहे पण केवळ पूजा करण्यापेक्षा तिचे औषधी गुणधर्मही जाणून घेतले पाहिजेत. तुळशीला मंंजिर्‍या लागतात आणि त्या वाळून जातात. वाळल्या की त्या तोडाव्यात आणि त्यांचे बी घरात जपून ठेवावे. त्याचा काढा खोकल्याला आणि सर्दीला औषध म्हणून गुणकारी ठरतो. फ्ल्यूसारख्या व्हायरल आजारावर औषध नाही असे म्हटले जाते पण तुळशीचा काढा हे त्यावर औषध म्हणून उपयुक्त ठरते असे आढळून आले आहे.

अश्‍वगंधा ही वनस्पती तणावावर चांगली उपयोगी पडते आणि तिच्याने पेशंटला चांगली शांत झोप येते. झोप येत नसल्यास झोपच्या गोळ्या घेण्यापेक्षा या वनस्पतीची पाने खाल्ली तर शांत झोप येण्यास उपयोगी पडेल. आपल्या आजकालच्या दगदगीच्या जीवनात आपल्या पचनशक्तीवर गंभीर परिणाम होतात. त्यावर त्रिफळा फार उपयुक्त आहे. त्याने पोट साफ होण्यास मदत होते आणि मलावरोधातून सुटका होते. नीम म्हणजे कडूलिंब हे झाड तर पदोपदी दिसते. त्याचे अनेक उपयोग आहेत. त्यातल्या त्यात त्याच्या काडीने दात घासले जातात आणि त्वचारोगावर त्याचा वापर चांगला असतो. हरिद्रा आणि उडुची या दोन वनस्पतीही औषधी गुणांनी युक्त आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment