चला कर्नाटकातील कुर्गच्या सफरीवर


शाळा कॉलेजना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या असल्याने आता घरोघरी प्रवासाचे बेत आखले जात आहेत. जर एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जावे, कॅम्पिंगचा आनंद घ्यावा, रिव्हर राफ्टींगचे थ्रील अनुभवावे असे काहीसे बेत बनत असतील, तर कर्नाटक राज्यातील कुर्ग येथे अवश्य भेट द्यावी.

कुर्ग येथे पर्यटकांना कँपिंगचा आनंद घेता यावा ह्या करिता अनेक सुंदर कँपिंग साईट्स आहेत. शहराच्या गर्दीपासून, प्रदूषणापासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात राहून पक्षांचा गोड किलबिलाट ऐकत आराम करण्याची ही एक उत्तम संधी आहे. येथून दिसणाऱ्या सूर्योदयाचे दृश्य मनामध्ये कायमचे कोरले जाईल. उत्तम हवामान आणि चहूकडे हिरवागार गारवा, मनाला सुखाविणारा आहे. थंडीमध्ये किंवा पावसाळा संपल्यानंतर ही येथे येऊन कँपिंगचा आनंद घेता येईल. तसेच जर येथे रिव्हर राफ्टींगचे थ्रील अनुभवायचे असेल, तर सकाळी लवकर बारापोल येथे पोहोचून राफ्टींग करता येईल. येथील पाण्यातील करंटस् अतिशय वेगवान असून, इथे राफ्टींग करण्याचा उत्साह आणि आनंद काही औरच असतो.

वेस्टर्न घाट्सचा एक भाग असलेल्या कुर्ग या ठिकाणावर निसर्गाचा वरदहस्त आहे. कुमार पर्वत नामक १७१२ मीटर उंचीवर असलेले शिखर कुर्गमधील सर्वोच्च शिखरांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे आहे. ह्या शिखरावर जाण्यासाठी ट्रेक्स आयोजित केले जात असतात. त्यामुळे ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे, त्यांनी हा अनुभव अवश्य घ्यावा. तसेच कुर्गमध्ये अनेक कॉफी प्लांटेशन्स असून, तिथे कॉफी टेस्टिंग सेशन्स मध्ये तुम्ही भाग घेऊ शकता.

कुर्ग येथील पुष्पगिरी अभयारण्याला भेट ही प्राणीपप्रेमींसाठी, अनेक प्राणी पाहण्याची उत्तम संधी आहे. आपल्या जगातून नामशेष होऊ घातलेल्या अनेक दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती येथे आहेत. ह्या अभयारण्याला युनेस्कोने वर्ल्ड हेरीटेज साईट घोषित केले आहे. येथे रात्री मुक्काम करून असंख्य ताऱ्यांनी चमचमणारे आकाश पाहण्याचा आनंद काही वेगळाच. ह्या अभयारण्याला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च हा काळ सर्वोत्तम आहे.

Leave a Comment