महादेवाने येथे पचविले होते हलाहल विष


देव आणि दानव यांनी अमृत प्राप्तीसाठी केलेल्या समुद्र मंथनातून निघालेले कालकूट हे हलाहल म्हणजे जहाल विष भगवान महादेवाने प्राशन केले आणि त्यामुळे सर्व जगाचा विनाश टळला याची कथा आपण ऐकली असेल. भगवान शिवाने ज्या ठिकाणी हे विष प्राशन केले ती जागा उत्तराखंड राज्यात असून तीर्थस्थळ हृषीकेश पासून अगदी जवळ १५ किमीवर आहे. या जागी महादेवाचे भव्य प्राचीन मंदिर असून ते मणीकुट पर्वतावर आहे. हे मंदिर नीलकंठ महादेव म्हणून प्रसिद्ध आहे.

वास्तविक देवांचे देव महादेव यांचा वर्ण अगदी कापरासारखं गोरापान. फक्त त्यांच्या गळा निळा म्हणून ते नीलकंठ. कथा सांगते समुद्रमंथनातून आलेले हलाहल इतके जहाल होते कि त्याच्या जळजळीत पणामुळे दाही दिशा जळू लागल्या. सर्वत्र हाहाकार माजला आणि देवता, राक्षस, यक्ष,गंधर्व, हि विषारी उष्णता सहन करू शकले नाहीत. यातून सुटकेसाठी महादेवाला प्रार्थना केली गेली तेव्हा त्यांनी ते विष प्राशन करायचा निर्णय घेतलं.


विष प्राशन करताना देवी पार्वतीने महादेवाचा कंठ दाबून धरला त्यामुळे हे विष पोटापर्यंत गेले नाही आणि गळ्यात राहिले. मात्र त्यामुळे महादेवाचा गळा निळा झाला. विषाचा दाह थंड करण्यासाठी देवाने गळ्याभोवती नाग गुंडाळला. विषप्राशन केल्यावर अनेक वर्षे महादेवानी आराम केला. नंतर देवानी त्यांना जगव्यवहार सुरळीत सुरु ठेवा असा आग्रह केला तेव्हा महादेव परत कैलासावर गेले असे मानले जाते.

हे नीलकंठ महादेव मंदिर समुद्र सपाटीपासून ५५०० फुट उंचावर आहे. अत्यंत सुंदर बांधकाम असलेल्या या मंदिराच्या कळसाखाली समुद्रमंथनाचा देखावा असून गर्भगृहात महादेव विषप्राशन करत असतानाचे भव्य पेंटिंग आहे. आत शिवलिंग आहे. पार्वतीमातेचे मंदिर समोरच्या पहाडावर आहे.

Leave a Comment