झाड जिवंत राहावे म्हणून त्याला सलाईन द्वारे औषधोपचार


जर एखाद्याची तब्येत बिघडली, आणि तोंडावाटे औषधे देणे जर शक्य नसले, तर त्या व्यक्तीला सलाईनद्वारे औषधोपचार केले जातात, ही पद्धत आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. पण तेलंगाणा राज्यामध्ये एका सातशे वर्षे जुन्या वडाच्या झाडाला जिवंत ठेवण्यासाठी सलाईन द्वारे औषधोपचार करण्यात येत आहेत. तेलंगाणा राज्यातील मेहबूबनगर जिल्ह्यामधील एका सातशे वर्षे जुन्या वडाच्या झाडाचे आयुष्यमान वाढविण्याचे प्रयत्न तेथील वन विभाग करीत आहे.

हे वडाचे झाड सातशे वर्षे जुने असून, जगातील दुसरे सर्वात मोठे वडाचे झाड आहे. मेहबूबनगर जवळ हे झाड उभे असून तीन एकरांच्या परिसरामध्ये ह्या झाडाचा विस्तार आहे. ह्या झाडाला येथील स्थानिक भाषेमध्ये ‘ पिल्लालामार्री ‘ असे म्हटले जाते. ‘लहान मुलांचे वडाचे झाड’, असा ह्या शब्दाचा अर्थ आहे. गत वर्षीपर्यंत हे झाड पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असे, पण त्यांनतर हे झाड कमजोर होऊन त्याची पडझड सुरु झाल्यानंतर वन विभागातर्फे पर्यटकांना इथे येण्यासाठी मनाई करण्यात आली होती.

ह्या झाडाला उजव्या बाजूने मोठ्या प्रमाणावर वाळवी लागली असल्याने हे झाड आतून पोखरले जाऊन कमजोर पडू लागले आणि त्याची पडझड सुरु झाली. तसेच तिथे येणाऱ्या पर्यटकांनी ह्या झाडाच्या फांद्याचा वापर झुल्यासारखा केल्यामुळे ह्या झाडाच्या फांद्या आणखीनच वाकल्या आणि त्यामुळे ही झाड कमजोर झाले असल्याची माहिती वन विभागातर्फे देण्यात आली. झाडाची पडझड होत आहे हे लक्षात येताच वन विभागाने या ठिकाणी पर्यटकांना येण्यास मनाई केली.

झाडाची पडझड रोखण्याकरिता ‘क्लोरोपायरीफॉस’ नामक औषधाच्या मदतीने वाळवी रोखण्याचा प्रयत्न वन विभागातर्फे करण्यात आला. ह्यासाठी झाडाच्या मुळांच्या जवळ एक खड्डा करून त्यामध्ये क्लोरोपायरीफॉस हे औषध पाण्यामध्ये मिसळून झाडाच्या मुळाशी फवारण्यात आले. तसेच ज्या भागामध्ये वाळवी लागली होती, तिथे लहान लहान भोके करून त्यामध्ये ही प्रेशर पंप्सच्या मदतीने औषध घालण्यात आले. पण ह्या उपायांना यश आले नाही. त्यानंतर औषध पाण्यामध्ये मिसळून सलाईन द्वारे झाडामध्ये ‘इंजेक्ट’ करण्याची कल्पना सुचल्यानंतर झाडावर शेकडो बाटल्या लटकवून त्यामधून झाडामध्ये औषध इंजेक्ट करण्याचे काम सुरु झाले. सलाइनच्या बाटल्यांमध्ये हे औषध मिसळून दर दोन मीटर अंतरावर एक बाटली ह्या प्रमाणे झाडाच्या संपूर्ण विस्तारामध्ये ह्या बाटल्यांचे जाळे फैलाविले गेले.

तसेच हे झाड जिथे उभे आहे, त्याच्या आसपासच्या परीसरामधेही औषधाची फवारणी तज्ञांच्या देखरेखीखाली केली जात असून, आता झाडाची वाळवी मोठ्या प्रमाणात कमी झाली असल्याचे समजते. आणखी दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये हे झाड संपूर्णपणे निरोगी होईल अशी खात्री वैज्ञानिकांना वाटत आहे.

Leave a Comment