बँकांमध्ये नोटबंदीनंतर जमा झाल्या विक्रमी खोट्या नोटा


नवी दिल्ली – भारतीय बँकांमध्ये नोटबंदीनंतर सर्वाधिक खोट्या नोटा जमा झाल्या असून यादरम्यान संशयित व्यवहारात ४८० टक्क्यांची वाढ झाली आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशात झालेल्या नोटबंदीनंतर संशयितरीत्या बँकांमध्ये जमा झालेल्या रकमेसंदर्भातील पहिल्याच अहवालात हा खुलासा झाला आहे. हा अहवाल अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने (एफआययू) जारी केला आहे.

देशात होणाऱ्या संशयित आर्थिक व्यवहारावर ही संस्था लक्ष ठेवते. या अहवालानुसार सरकारी, खासगी क्षेत्राव्यतिरिक्त संस्थांमध्ये सामूहिक स्वरूपात ४०० टक्क्यांपेक्षा जास्त संशयित व्यवहार झाले असून वर्ष २०१६-१७ मध्ये एकूण ४.७३ लाखांपेक्षा जास्त असे व्यवहार झाले असल्याचा दावा या अहवालामध्ये करण्यात आला आहे.

अहवालानुसार एफआययूला आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये बँका आणि इतर आर्थिक संस्थांच्या वतीने ४.७३ लाख संशयित व्यवहाराचा अहवाल (एसटीआर) मिळाले आहेत. यात २०१५-१६ च्या तुलनेत चारपट वाढ झाली आहे. एसटी आरमध्ये सर्वाधिक प्रकरणे बँकेच्या श्रेणीत समोर आले आहेत. यामध्ये २०१५-१६ च्या तुलनेत ४८९ टक्क्यांची वाढ झाली असून आर्थिक संस्थांच्या बाबत ही २७० टक्के वाढ आहे.

एकूण १.०५ लाख एसटीआर वर्ष २०१५-१६ मध्ये बनवण्यात आल्या होत्या. यातील बँकांच्या वतीने ६१,३६१ एसटीआर एफआययूला पाठवल्या होत्या. त्यांची संख्या नोटबंदीनंतर वाढून ३,६१,२१५ पर्यंत पोहोचली होती. इतर आर्थिक संस्थांच्या बाबत हा आकडा ४०,०३३ होता, जो नोटबंदीनंतर वाढून ९४,८३७ वर पोहोचला. सीसीआर म्हणजेच खोट्या चलनाचा अहवाल, हा व्यवहारांवर आधारित असतो. ज्या वेळी खोट्या नोटा असल्याचे लक्षात येते त्याच वेळी तो बनवला जातो. असे असले तरी किती खोट्या नोटा पकडण्यात आल्या त्याचा उल्लेख नाही.

Leave a Comment