निरोगी राहण्यासाठी नेमके काय करावे यावर खूप चर्चा होते पण काही तज्ज्ञांनी आरोग्याच्या अशा दहा सवयी सांगितल्या आहेत की, ज्या अंगी बाणवायला सोप्या आहेत आणि परिणामकारक आहेत. या सवयी म्हणजे जीवन पद्धतीतला बदल आहे. उदा. अन्न नीट चावून खा. असे खाण्याने ते पचनास सुलभ होते. आपली पचनाची क्रिया पोटातच होते असे नाही. ती दातांपासून सुरू होत असते. या आहार तज्ञांनी साखर आणि मीठ यांना पांढरी विषे म्हटले आहे. ती विषे असली तरीही त्यांना खाण्यातून बाद करता येत नाही. साखर बरीच बाद करता येते पण मीठ बाद न करता त्याचा मर्यादित वापर केला पाहिजे. कारण साखरेने मधुमेह बळावतो आणि मिठाने रक्तदाब वाढतो. हे दोन विकार अनेक विकारांच्या मुळाशी असतात आणि ते कायमचे कधीच दुरुस्त होत नाहीत.
१० आरोग्यदायी सवयी
चहाच्या बाबतीतही हे तज्ज्ञ असाच इशारा देतात पण चहा बाद करता येत नाही. आपला नेहमीचा चहा नाकारून आपण ग्रीन टी प्राशन करू शकतो. त्यात अनेक रोगप्रतिबंधक गुण आहेत. दूध हे आपण निरोगी समजतो पण त्याच्या बाबतही हे लोक इशारा देत आहेत. पाणी हे तर आपण पीतच असतो पण ते किती आणि कधी प्राशन करतो याला फार महत्त्व आहे. सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यावे. जेवताना किंवा काहीही खाताना पाणी पिऊ नये. खाणे संपल्यावर ४५ मिनिटे किंवा जमल्यास एक तास पाणी पिणे टाळावे. विशेषत: पोट सुटलेल्या लोकांना ही सवय फार उपयोगी पडते. नेहमी प्रवास करणारांनी रोजचा व्यायाम चुकवू नये. प्रवासात खाण्याच्या वेळा चुकवू नयेत. घरून निघताना जेवून निघावे.
बैठी कामे करणारांनी आपल्या कामातला वेळ काढून जमेल तसा व्यायाम करावा. हात पाय हलवावेत. पायांना ताण द्यावा. संगणकावर नजर लावावी लागत असेल तर अधुन मधून झाडांकडे पहावे. एकदाच जास्त न खाता चार पाच वेळा थोडे थोडे खावे आणि प्रत्येक खाण्यानंतर निदान दहा मिनिटे तरी चालावे. इतर व्यायामाला वेळ मिळत नसला तरी हे चालणेच निदान पाऊण तासाचे होते आणि फिटनेस टिकतो. शेवटची सूचना म्हणजे झोप. लवकर झोपावे आणि लवकर उठावे पण झोपेची वेळ नीट निवडावी. रात्रीचे जेवण आणि झोपेची वेळ यात किमान दोन तासांचे अंतर असावे. असे केल्याने झोप चांगली लागते. अन्यथा पोटात अन्न पचलेले नसते आणि ते आपल्याला शांत झोपू देत नाही.