दोनशे वर्षांपासून लपवून ठेवलेल्या राणीच्या हृदयाचे रहस्य नेमके काय?


फ्रांस येथे दोनशे वर्षांपासून एक हृदय सोन्याच्या महिरपीमध्ये जडवून एका वस्तुसंग्रहालयामध्ये ठेवले गेले होते. हे ह्र्दय इतकी वर्षे सांभाळून ठेवण्यामागे नेमका कोणता उद्देश होता असे विचार करणाऱ्याला नक्कीच वाटेल. ह्याबद्दल हकीकत अशी, की हे हृदय कोण्या साध्यासुध्या व्यक्तीचे नसून, एका राणीचे आहे. राणीच्या मृत्युनंतर हे हृदय सरकारी संपत्ती म्हणून घोषित करण्यात आले, आणि फ्रांस येथील एका वस्तूसंग्रहालयामध्ये ठेवण्यात आले.

राणीचे हे जपून ठेवलेले हृद्य तेथील नागरिकांसाठी अतिशय सन्मानाची बाब आहे. त्यामुळे राणीचे हृदय ठेवलेली महिरप जेव्हा वस्तूसंग्रहालयामधून चोरीला गेली, तेव्हा त्याबद्दल नागरिकांचा संताप व्यक्त झालेला पाहायला मिळाला. पंधराव्या-सोळाव्या शतकामध्ये फ्रांसची सम्राज्ञी राणी अॅन हिचे ते हृदय आहे. फ्रांसची राणी अॅन ही अतिशय लोकप्रिय असून, तिचे पूर्ण नाव अॅन ऑफ ब्रिटनी असे होते.

अॅनचा जन्म ‘कासल ऑफ नान्ते’ येथे १४७७ साली झाला. तिचे पूर्वज फ्रान्समधील ब्रिटनी भागाचे निवासी असल्यामुळे तिचे नाव अॅन ऑफ ब्रिटनी असे पडले. आपल्या पूर्वजांची ओळख अॅनने आपल्या नावामध्ये जपली. म्हणूनच ह्या परिवाराशी संबंधित प्रत्येकाच्या नावापुढे ‘ब्रिटनी’ जोडले जात असे. ह्या परिवारातील अॅन, पुढे फ्रांसची राणी बनली. त्यामुळे ह्या परिवारातील, ती सर्वात बहुचर्चित व्यक्ती ठरली. बाळपणापासूनच अॅन विलक्षण सुंदर दिसत असे. अतिशय तीव्र बुद्धिमत्तेसोबतच विलक्षण हळवे आणि दयाळू मन तिला लाभले होते.

विणकाम, भरतकाम ही अतिशय नाजूक कलाकुसरीची कामे अॅन लीलया करीत असे. अॅन अवघी नऊ वर्षांची असताना तिच्या आईचे निधन झाले. त्यानंतर अॅनच्या वडिलांनी तिला कधीही एकटे सोडले नाही. आपल्या वडिलांच्या सोबत अॅन अनेक राज्यांचे, किल्ल्यांचे दौरे करीत असे. अॅन वयात आल्यावर तिचा विवाह झाला, पण तिचे पती वर्षभरातच मरण पावले. त्यानंतर अॅन आपल्या वडिलांकडे परतली. काही काळाने चार्ल्स नामक युवकाने अॅनला पाहिले, आणि तिला पाहता क्षणीच तो तिच्या प्रेमात पडला. त्याने अॅनच्या वडिलांकडे अॅनसाठी लग्नाची मागणी घातली. वडिलांनी संमती देताच चार्ल्स आणि अॅन विवाहबद्ध झाले.

पुढे हेच चार्ल्स फ्रांसचे राजे बनले आणि आठवे किंग चार्ल्स म्हणून ओळखले गेले. त्याचबरोबर अॅन देखील फ्रांसची राणी बनली. पण त्या दोघांनाही अपत्यसुख लाभले नाही. विवाहानंतर अवघ्या सात वर्षांमध्ये चार्ल्स मरण पावले. सत्तेच्या लालसेने चार्ल्सच्या बहिणीचे पती बारावे लुई यांनी अॅनशी विवाह केला. राणी अॅन कायम आपल्या देशाशी आणि तेथील नागरिकांशी एकनिष्ठ राहिली. १५१४ साली, अवघ्या ३६व्या वर्षी राणीचा मृत्यू झाला. त्यांचे शव सेंट डेनिस येथे दफन केले गेले. पण राणीची आठवण लोकांच्या मनामध्ये शतकानुशतके राहावी यासाठी तिचे हृदय शंभर ग्राम वजनाच्या सोन्यामध्ये जडवून त्याचे जतन केले गेले. हीच फ्रेम चोरीला गेली असल्याने फ्रांसचे नागरिक अतिशय कष्टी झालेले आहेत.

Leave a Comment