देशात आता होणार सेंद्रिय माशांचे उत्पादन


आरोग्याबाबत जागरूक असलेल्या व्यक्तींना सेंद्रीय भाज्या व फळे खायला आवडतात. मात्र शाकाहारी लोकांना उपलब्ध असलेली ही सोय आता मांसाहारी लोकांनाही मिळणार असून देशात लवकरच सेंद्रिय माशांचे उत्पादन होणार आहे. खवय्यांची गरज पुरवतानाच यातून देशाला बहुमोल परदेशी चलन मिळण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

परदेशात जैविक माशांची मागणी पूर्ण करणे तसेच शेतकऱ्यांच्या कमाईत वाढ करणे, या उद्देशाने स्वित्झर्लंडच्या काप्प कोऑपरेटिव्ह या कंपनीसोबत सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने हा करार केला आहे. काप्प कोऑपरेटिव्ह ही ठोक व किरकोळ व्यापार करणारी कंपनी आहे.

ही योजना सुरुवातीला केरळमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून ती यशस्वी झाल्यानंतर तिचा विस्तार करण्यात येईल. केरळमध्ये सुमारे एक हजार हेक्‍टर क्षेत्रात झींगा माशांच्या ब्लॅक टायगर या जातीचे पालन व उत्पादन केले जाणार आहे. जागतिक बाजारात या प्रकारच्या झिंग्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

काप्प कोऑपरेटिव्ह ही कंपनी कंपनी युरोपीय देशांमध्ये 2200 पेक्षा अधिक आऊटलेट चालवते. भारतापूर्वी तिने व्हिएतनाममध्ये सेंद्रिय मत्स्यपालन सुरू केले असून तेथील शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.

सेंद्रिय मत्स्यपालनात अधिक खर्च येत असल्यामुळे अनेक शेतकरी त्यापासून दूर राहतात. मात्र हा करार केल्यामुळे शेतकऱ्यांना सामान्य माशांच्या तुलनेत अधिक किंमत मिळेल आणि त्यामुळे मत्स्यपालनाला प्रोत्साहन मिळेल, असे प्राधिकरणाचे अधीक्षक ए. जयतिलक यांनी सांगितले

भारतीय झिंग्याची निर्यात जगातील सर्व प्रमुख देशांमध्ये केले जाते आणि चीन नंतर भारत सागरी खाद्याचा सर्वात मोठा निर्यातक देश आहे.

Leave a Comment